मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव इमारातींमधून सुरू झाला. घरात काम करणाऱ्या कामगारांमार्फत तो झोपडपट्टीत पसरला. त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावर पुन्हा कोरोनाने इमारतींना लक्ष्य केले आहे. इमारतीमध्ये कामगारांना दिलेली परवानगी आणि लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याने तसेच कामानिमित्त घराबाहेर पडल्यावर इतरांच्या संपर्कात आल्याने इमारतींमध्ये कोरोनाची लागण होत असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबईत 11 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. हा रुग्ण इमारतीमध्ये राहणारा होता. विदेशात प्रवास करून आलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. याच दरम्यान घरात काम करणाऱ्या कामगारांच्या माध्यमातून कोरोना झोपडपट्टीत पोहोचला. पाहता पाहता मुंबईमधील धारावी, वरळीसारख्या झोपडपट्टीला कोरोनाने विळखा घातला. पालिकेने ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट, रुग्णाच्या संपर्कात आलेल्याना क्वारंटाइन करत झोपडपट्टीतील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणला. मात्र, अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच कोरोनाने पुन्हा इमारतीमधील रहिवाशांना लक्ष्य केले आहे. सध्या मुंबईत झोपडपट्टीपेक्षा इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. अंधेरी ते दहिसर, भांडूप, मुलुंड, ग्रॅंटरोड आदी विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. इमारती, कॉम्प्लेक्समध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क न लावणे आदी नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नियमांची कडक अंमलबजावणी करून घ्या, असे आदेश सर्व विभागातील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. झोपडपट्टी आणि चाळीत एखादा रुग्ण असल्यास लपून राहणे शक्य नसल्याने रुग्ण असल्याचे समोर येते. मात्र, रुग्ण इमारतीत असल्यास रुग्णाची माहिती लवकर समोर येत नाही. या दरम्यान संबंधित रुग्ण इतरांच्या संपर्कात आला असल्याने इतरांनाही कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती पालिका अधिकऱ्यांनी दिली.
काम, घरातील कामगारांमुळे कोरोना -
अनलॉकनंतर इमारतींमधील नागरिक कामानिमित्त बाहेर जात आहेत. तसेच घरामध्ये कामासाठी कामगारांना परवानगी देत आहेत. यामुळे इमारतीमधील कोरोना रुग्ण वाढत आहेत. झोपडपट्टीत एखादा रुग्ण असला तर त्वरित माहिती मिळते. मात्र, इमारतीमध्ये लक्षणे दिसली तरी कोणाला त्याची माहिती मिळत नाही. यामुळे इमारतीमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. इमारतींमधील रहिवाशांनी आरोग्य विभाग आणि पालिकेने फिजिकल डिस्टन्स, मास्क वापरणे, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत या सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करावे. काही आरोग्याबाबत समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घाबरून जाऊ नये, असे आवाहन मेडस्कॅप इंडिया व वी डॉक्टर्स कॅम्पेन फॉर कोव्हीडच्या संस्थापिका रेडिओलॉजिस्ट डॉ. सुनिता दुबे यांनी केले आहे.
चाळी, झोपडपट्ट्या सिल -
मुंबईत रुग्ण आढळून आलेल्या 6087 इमारती आणि त्याचे काही मजले सिल करण्यात आले आहेत. त्यात 2 लाख 70 हजार घरे आहेत. त्यात सुमारे 9 लाख 40 हजार नागरिक राहत आहेत. अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मालाड, मुलुंड या विभागात सर्वाधिक इमारती सिल करण्यात आल्या आहेत, तर रुग्ण आढळून आलेल्या 654 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभाग सिल करण्यात आले आहेत. या चाळी आणि झोपडपट्टीत 9 लाख 70 हजार घरे असून 41 लाख 70 हजार नागरिक राहत आहेत. कुर्ला आणि भांडुप विभागात सर्वाधिक चाळी आणि झोपडपट्ट्या सिल करण्यात आल्या आहेत.