मुंबई - राज्यात 36 पैकी सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच अन्य 25 जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढ झाली आहे. मात्र, लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
लस घेण्यासाठी गर्दी करू नका
राज्यात 45 वर्षांवरील सुमारे 1 कोटी 65 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ 25 हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते. आज (दि. 4 मे) राज्याला 9 लाख डोस मिळाले आहेत. त्यातून 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. 45 वर्षांवरील सुमारे 3.5 कोटी लोकसंख्येपैकी 45 टक्के नागरिकांना लसीकरण झाले आहे. 1 मेपासून 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे 1 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे 13 लाख 58 हजार तर कोवॅक्सिन लसीच्या 4 लाख 89 हजार असे एकूण 18 लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. स्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील. तरुणाईने लसीकरणासाठी गर्दी करू नये. पोर्टलवर नोंदणी आणि दिनांक, वेळ निश्चिती नंतरच लस दिली जाईल. त्यामुळे संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
रेमडेसिवीरचा वाटप सूत्रानुसार
राज्य शासनाने रेमडेसिवीर, ऑक्सिजन यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. मदत व पुर्नवसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या जागतिक निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसिवीर, 20 हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, 27 स्टोरेज टॅंक उपलब्ध होतील. जेणे करून ऑक्सिजनचा बफर साठा करून ठेवता येईल.
राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 150 ऑक्सिजन प्लांट खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यांमध्य ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी जिल्हा विकास व नियोजन आणि राज्य आपत्ती पुर्नवसन निधी यामधून निधी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाकडून राज्याला जे 10 पीएसए प्लांट मंजूर आहेत त्यातील 9 प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या केंद्र शासनाकडून राज्याला दररोज 40 हजारांच्या आसपास रेमडेसिवीर मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे ते कमी पडत आहेत. पुरवठा झालेले रेमडेसिवीर जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांना वाटप केले जात आहेत.
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्ण संख्या घटली
राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, राज्य सरकारने रेमडेसिवीरसाठी ग्लोबल टेंडर काढले आहेत. वेगवेगळ्या देशातून निविदा आल्या आहेत. मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवामार्फत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.
पत्रकारांचा निर्णय कोअर कमिटी
देशातील विविध राज्यात पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर्समध्ये समाविष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय घेणार आहे का, असा प्रश्न टोपे यांना विचारला असता, 18 ते 44 वर्षांवरील सर्वांना सरसकट लस देणार आहे. पत्रकारांसाठी कोणतेही विगतवार केलेलं नाही. फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून वेगवेगळी लोक काम करतात. त्यांना ही सामावून घ्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. तरीही पत्रकारांसंदर्भात मंत्रिमंडळाच्या कोअर कमिटीमध्ये निर्णय घेऊ, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबईतील शालेय बस मालक-चालक कोरोनामुळे आर्थिक संकटात