मुंबई - राज्याच्या राजधानीत कोरोना थैमान घालत आहेत. दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. याचा आरोग्यसेवांवर ताण येत आहे. प्रशासन परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दावे करत आहे, मात्र या दाव्यांची पोलखोल करणारे एक चित्र केईएम रुग्णालयात पहायला मिळाले. रुग्णांसाठी बेड अपुरे पडत असल्याने त्यांना पुठ्ठ्यावर झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
केईएम मुंबईतील सर्वात मोठे रुग्णालय आहे. मात्र, सध्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येपुढे रुग्णालयाने हात टेकले आहेत. अनेक रुग्णांना जागेअभावी जमिनीवर झोपावे लागत आहे. या रुग्णालयात दाखल झालेल्या एका कोरोना रुग्णाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली.
हा रुग्ण दोन दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयात निमोनियामुळे अॅडमिट झाला होता. तेव्हा त्याची चाचणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. मात्र, दोन दिवसांपासून त्याच्यावर कुठलेही उपचार होत नसून त्याला साधा बेडही मिळाला नाही. त्यामुळे पुठ्ठ्यावर झोपून त्याला आपले गाऱ्हाणे सोशल मीडियावर मांडावे लागले. केईएम रुग्णालयातर्फे या विषयावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. आजही या रुग्णाला पुठ्ठ्यावर झोपूनच उपचार घ्यावे लागत आहेत.