मुंबई - मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असून, रूग्णवाढीचा दर आता 0.91 टक्क्यांवर आला आहे. हा दर आणखी कमी करायचा असेल तर मुंबई महानगर पालिकेला रूग्ण वाढीत आघाडीवर असलेल्या 10 विभागामधील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणावे लागणार आहे. कारण मुंबईतील रूग्ण दरवाढीचा दर 0.91 टक्के असताना 24 पैकी तब्बल 10 विभागाचा रूग्ण वाढीचा दर 1 ते 1.5 टक्के आहे. डी, आर-सी, टी, पीएस, ए, आरएन, एच वेस्ट, बी आणि सी असे हे 10 विभाग आहेत. या विभागातील रूग्ण वाढीवर नियंत्रण आणणे हे आता पालिकेसाठी आव्हान ठरत आहे.
पालिकेच्या आकडेवारीनुसार सध्या मुंबईच्या रूग्णवाढीचा दर दिवसेंदिवस खाली येत आहे. आजच्या घडीला हा दर 0.91 टक्के आहे. असे असताना मुंबईतील तब्बल 10 विभागात मात्र रूग्णवाढीचा दर यापेक्षा बराच जास्त आहे. रूग्णवाढीत मुंबईत पहिल्या क्रमांकावर आहे डी विभाग. या विभागात ग्रँटरोडचा परीसर येत असून, येथील रूग्ण वाढीचा दर सर्वात जास्त 1.5 टक्के आहे. म्हणजेच दररोज मुंबईत जे रूग्ण आढळतात, त्यात सर्वाधिक रूग्ण या विभागातील असतात. सध्या या विभागात 4 हजार 365 इतके रूग्ण असून, शुक्रवारी 65 तर शनिवारी 71 रूग्ण आढळले होते.
तर दुसऱ्या क्रमांकावर आर-सेंट्रल हा विभाग अर्थात बोरिवलीचा परिसर आहे. सद्या येथील एकूण रुग्णांचा आकडा 5 हजार 450 असून येथे दररोज 50 हून अधिक रूग्ण आढळत आहेत. शुक्रवारी येथे तब्बल 123 रूग्ण आढळले होते. तर शनिवारी 69 रूग्ण आढळले असून, येथील रूग्ण वाढीचा दर 1.5 टक्के आहे. टी विभाग अर्थात मुलुंड परिसराचा रूग्ण वाढीचा दर 1.3 टक्के असून, येथे शुक्रवारी 75 तर शनिवारी 36 रूग्ण आढळले होते. त्यानंतर आर-साऊथ म्हणजेच गोवंडी परिसरातही रूग्ण वाढ मोठ्या संख्येने होत असून येथील रूग्ण वाढीचा दर 1.2 टक्के इतका आहे. येथे शुक्रवारी 61 तर शनिवारी 65 रूग्ण आढळले होते. ए विभागही रूग्ण वाढीतील पहिल्या 10 विभागात असून या विभागाचा दर 1.2 टक्के आहे. कुलाबा परिसर या विभागात येत असून येथे शनिवारी 35 रूग्ण आढळले आहेत. घाटकोपर अर्थात पी साऊथ विभागाचा रुग वाढीचा दर 1.1 टक्के असून येथे शुक्रवारी 64 तर शनिवारी 34 रूग्ण आढळले आहेत. दहिसर अर्थात आर उत्तर विभागाचा दर 1.1 टक्के असून येथे शनिवारी 38 रूग्ण आढळले आहेत.
एच पश्चिम म्हणजेच वांद्रे पश्चिम विभागात ही 40 पर्यंत रूग्ण आढळत असून येथील रूग्ण वाढीचा दर 1.1 टक्के आहे. त्याचवेळी बी आणि सी विभागाचा दर 1 टक्के असा आहे. येथे 15 ते 20 रूग्ण आढळत आहेत. या 10 विभागाचा दर खाली आला तर मुंबईतील रूग्ण संख्या आणखी कमी होऊन मुंबईचा दर ही खाली येईल असे म्हटले जात आहे.
दरम्यान, याविषयी 1.5 टक्के असा सर्वाधिक दर ज्या विभागात आहे, त्या डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांना याविषयी विचारले असता त्यांनी रूग्ण संख्या वाढती असल्याचे सांगतानाच ही वाढ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. या भागात उच्चभ्रू वस्तीमध्येच सध्या रूग्ण जास्त आढळत असून, त्यांच्याकडे काम करणाऱ्यामुळे रूग्ण वाढत आहेत. पण वाढ होत असली तरी एक दिलासादायक बाब आहे की, येथील 95 टक्के रूग्ण लक्षणे नसलेली आहेत असेही त्यांनी सांगितले आहे. तर टी विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी आमच्या विभागात टेस्ट जास्त होत असल्याने रूग्ण ही त्या तुलनेत जास्त आढळत असल्याचे सांगितले. तर गंभीर रूग्ण कमी असून, आम्ही संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करत असल्याचेही स्पष्ट केले.