मुंबई - पुणे येथे उपचार सुरू असलेल्या दोन कोरोनाबाधित प्रवाशांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरू असून, या रुग्णांसोबतचे मुंबईतील दोन सहप्रवासी देखील आज कोरोना बाधित असल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10 झाली आहे. तसेच मोठे कार्यक्रम रद्द करण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - मध्यप्रदेश सत्तापेच: काँग्रेस आमदार जयपुरात, ब्यूना रिसॉर्टमधील ५० खोल्या 'बुक'
मुंबई मध्ये दोन कोरोना बाधीत रुग्णाचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम रद्द करणे गरजेचे आहे. दोन रुग्णांची टेस्ट पॉझिटीव्ह असले तरी त्यांची तब्येत स्थिर असून गंभीर परिस्थिती नाही. राज्यातल्या सर्व संशयित रुग्णांची काटेकोरपने तपासणी करण्यात येत आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी पण घाबरून जाऊ नये, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी केले आहे.
सध्या पुणे येथे १८ जण तर मुंबईत १५ जण भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वायसीएम रुग्णालय पिंपरी-चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.
दरम्यान, आज सकाळी आरोग्य मंत्र्यांनी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमण्यात येणार असून, त्यामध्ये आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, नगरविकास, महसूल, ग्रामविकास, गृह विभाग यांचे सचिव असतील, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पुणे येथे कार्यान्वीत असलेला नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जाणीवजागृती अधिक व्यापक करावी, अशा सूचना देतानाच यासाठी सर्व माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, आयुक्त अनुपकुमार यादव, माहिती व जनसंपर्क संचालक अजय अंबेकर, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.
११ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११९५ विमानांमधील १ लाख ३८ हजार ९६८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ६३५ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३७० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३४९ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व ३१२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३४९ प्रवाशांपैकी ३१२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध आहेत. मुंबईतील आयपीएल क्रिकेट मॅचेस दर्शकांशिवाय फक्त खेळले जातील त्याचे थेट प्रक्षेपण व्हावे किंवा पुढे ढकलण्यात यावेत असे दोन पर्याय सांगण्यात आल्याचे मंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - कोरोना: १ ली ते ९ पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव, थोड्याच वेळात मंत्रीमंडळाची बैठक