मुंबई- चीनमधील वुहानच्या धर्तीवर वांद्रे-कुर्ला संकुलात राज्यातले सर्वात मोठे कोविड समर्पित रुग्णालय उभारण्यात आले आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत एकही मृत्यू या कोविड सेंटरमध्ये झाला नसल्याची माहिती कोविड सेंटरमधून देण्यात आली होती. मात्र, सध्या या सेंटरमधील परिस्थिती बदलली आहे. सध्या मुंबईतील सर्वाधिक मृत्यू याच सेंटरमध्ये होत आहेत, अशी माहिती आहे.
बीकेसीमध्ये दोन फेजमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आले होते. पहिल्या फेजमध्ये 1100 बेड असलेल्या सेंटरमध्ये 500 ऑक्सिजन व 500 विना ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली होती. त्यामध्ये 1100 बेड या अतिदक्ष म्हणून राखून ठेवण्यात आले. दुसऱ्या फेजमध्ये 400 ऑक्सिजन व 400 विना ऑक्सिजन बेड तर 108 बेडस हे वेल ॲडव्हान्स सोयी असणारे उपलब्ध करण्यात आले होते. याशिवाय 120 बेड डायलिसिससाठी राखीव ठेवण्यात आले होते. या सेंटरमध्ये आतापर्यंत तब्बल साडे तीन हजार पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत. सध्या 532 रुग्ण येथे उपचार घेत आहेत. 52 रुग्ण आयसीयू कक्षात आहेत.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला त्यामध्ये राज्यातील बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून आले होते. मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी देशातील इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत सर्वाधिक होती. परंतु, हळूहळू गेल्या महिनाभरापासून ही संख्या कमी झाली. मात्र, मुंबईत कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सध्या मुंबईत 40 ते 50 रुग्ण दिवसाला दगावत आहेत. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून त्याची संख्या 30 ते 40 इतकी आहे. मुंबईत सध्या दिवसाला सरासरी एक हजार रुग्ण आढळत आहेत. रुग्णांची संख्या कमी आढळत असली तरी मृत्यूचे प्रमाण मुंबईत वाढलेले आहे. यामध्ये मुंबईतील बीकेसी कोविड सेंटरमध्ये मृत्यूंची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती आहे.
बीकेसी कोविड सेंटर येथील सद्यस्थिती काय आहे, याबद्दल जाणून घेण्याचा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने प्रयत्न केला. या सेंटरचे अधिष्ठाता राजेश ढेरे यांनी सध्या या रुग्णालयात किती लोक उपचार घेत आहेत व कोणत्या परिस्थितीत आहेत याविषयी माहिती दिली. परंतु, सध्या या सेंटरमध्ये हे किती मृत्यू होत आहेत या विषयी त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. ढेरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सवांद साधावा असे सांगतिले. कोविड सेंटर ज्यांच्या अंतर्गत येते ते अधिकारी सुरेश काकानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. मात्र, ईटीव्ही भारतला मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी 19 ऑगस्टपर्यंत मागील 3 आठवड्यात 91 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र, मागील आठवड्यापासून दरदिवशी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती आहे.
महापालिका, एमएमआरडीए व खासगी कंपनी प्रशासन बीकेसी कोविड सेंटरमध्ये उत्तम सोयीसुविधा आहेत, असा गाजावाजा करत आहे. कोविड सेंटरमध्ये वाढत असलेल्या मृत्यूमुळे या सेंटरच्या कामकाजावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.