मुंबई - कोरोना व्हायरसने मुंबईमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. परदेशवारी करणाऱ्यांच्या सानिध्यात आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आता कोरोनाने अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याना आपले लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. धारावी येथे मुंबई महापालिकेत सफाईचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असताना आता बेस्टमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज कुठे ना कुठे नवा रुग्ण आढळून येत आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. 'जसलोक' रुग्णालयातील एका नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर वरळी येथे राहणारा व धारावीत सफाईचे काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
त्यात आता बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये फोरमनला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला एसआरवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा कर्मचारी राहत असलेल्या टिळकनगर येथील इमारतीमधील रहिवाशांना तसेच तो काम करत असलेल्या बेस्टच्या डेपोमधील कर्मचाऱ्यांनाही 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.