मुंबई- कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटण्याची वेळ येऊन ठेपण्याच्या मार्गावर आहे. यादरम्यान राज्य सरकारला विविध माध्यमातून मिळणारे तब्बल ४९ हजार कोटींहून अधिकचे उत्पन्न घटले आहे. यामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट असून येत्या काही महिन्यांमध्ये सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा- चिंताजनक : नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचे अर्धशतक पूर्ण..४८ तासांत आढळले २५ रुग्ण
अनेक विकासकामांना कात्री लावण्याशिवाय पर्यांय नाही...
सरकारला मुद्रांक शुल्क नोंदणी, उत्पादन शुल्क, वाहन खरेदी-विक्री कर आदी अनेक मार्गातून येणारे उत्पन्न घटले असल्याने याचा मोठा भार सरकारी तिजोरीवर पडणार आहे. परिणामी अनेक प्रकारच्या विकासकामांना कात्री लावण्याशिवाय सरकारपुढे दुसरे पर्याय नसतील अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. अशा अडचणीच्या काळात केंद्र सरकारकडून येणाऱ्या जीएसटीच्या परताव्याची रक्कम अडकली आहे. तर कोरोनाचे महाभयंकर संकट असतानाही केंद्राने कोणेतही आर्थिक पॅकेज दिले नसल्याने सरकारचा आर्थिक डोलारा कोलमडण्याची शक्यता वित्तविषयक जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
१ लाख ९९ हजार ५३४ कोटी उपन्नाचा अंदाज होता...
राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीला अर्थसंकल्प सादर करताना, राज्याचे उत्पन्न हे १ लाख ९९ हजार ५३४ कोटी रुपये असेल असा अंदाज केला होता. त्यासाठी राज्यात महसूल आणि विविध करांच्या माध्यमातून येणाऱ्या रकमेचा अंदाज आणि त्यातून हे उत्पन्न मिळणार होते. मात्र, मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्यात राज्यात कोरोनाचे संकट उभे टाकल्याने राज्याच्या उत्पन्नावर प्रचंड मोठा परिणाम झाला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
जीएसटीच्या तुटीचे उत्पन्न १८ हजार कोटींनी घटणार...
राज्याला ८ लाख ८६ हजार वस्तू आणि ४६९ कोटी रुपये इतका सेवा कर मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यात घट होऊन हे उत्पन्न आता ६८ हजार ४६९ कोटी रुपयांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या जीएसटीच्या तुटीचे उत्पन्नही १८ हजार कोटींनी घटणार आहे. राज्य सरकारला विविध मार्गांनी उत्पन्न मिळते. त्यापैकी सर्वांत जास्त मुद्रांक आणि शुल्क नोंदणीच्या माध्यमातून मिळते. यंदा ते मार्च महिन्यात २९ हजार ५०० कोटी रुपयांचे अपेक्षित उत्पन्न मिळणार होते. तर जमीनी खरेदी विक्री आणि जमीन हस्तांतरण आदींमधून मिळणाऱ्या उत्पनातून १ हजार ६०० कोटी रुपयांचे नुकसान सरकारला झाले आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे सर्व व्यवहारच ठप्प झाले असल्याने सरकारचे प्रचंड मोठे उत्पन्न घटले आहे. त्यातच उत्पादन शुल्कातून सरकारला मोठा महसूल मिळत असतो. त्यातही तब्बल २००० कोटींची घट झाली असून वाहन खरेदी विक्री आदींच्या करांमध्ये ५०० कोटींहून अधिकची तूट झाली आहे. तर सरकारकडून या वर्षी कर संकलनाचे जे लक्ष ठेवण्यात आले होते. त्यात तुलनेत २७ हजार कोटी रुपयांची तूट होणार असल्याचे समोर आल्याने असे विविध मार्गांनी तब्बल ४९ हजार कोटींचे उत्पन्न घटले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.