मुंबई - महानगरपालिका प्रशासनाचे अथक प्रयत्न, उपाययोजना आणि मुंबईकर नागरिक, तसेच सर्व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे कोरोना संसर्गाची मुंबईतील स्थिती नियंत्रणात आली आहे. असे असताना, दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसह विविध कारणांसाठी नागरिकांची मॉल्स् यासह सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आढळत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने गर्दी नियंत्रित व्हावी यासाठी कठोर कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.
कारवाई अंतर्गत मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे यासारख्या सूचनांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध तीव्र कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती चहल यांनी दिली. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आणि दिपावली सणाचे औचित्य पाहाता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. कोरोनाबाधित रुग्ण, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होवू शकतो. ही बाब लक्षात घेत फटाके फोडण्यावरील नियंत्रणाबाबत या परिपत्रकामध्ये सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्य टास्क फोर्सने देखील गर्दीतून संसर्गाचा धोका वाढण्याचा इशारा यापूर्वी दिला आहे. त्यामुळे, सध्या दिपावली सणाच्या खरेदीसाठी होत असलेली गर्दी नियंत्रित व्हावी, तसेच फटाक्यांसंबंधी परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याविषयी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संयुक्त बैठक घेतली. त्यात सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सर्व सहआयुक्त व उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, संबंधित खातेप्रमुख, तसेच पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) हेही सहभागी होते.
टाळेबंदी नको असेल, तर सहकार्य करा -
बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त चहल म्हणाले की, मुंबईत कोरोना संसर्गावर आपण नियंत्रण मिळवले आहे. ही स्थिती कोणत्याही परिस्थितीत बिघडणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. जगातील काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून भारतातील काही शहरांमध्ये देखील कोरोना संसर्गाचा फैलाव पुन्हा वाढल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत टाळेबंदीसारखी कठोर उपाययोजना करण्यावाचून गत्यंतर राहात नाही. ती वेळ मुंबई महानगरावर पुन्हा येता कामा नये, यासाठी पावलोपावली खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये सण-उत्सवांचा देखील अपवाद करता येणार नाही. यापूर्वीच्या वेगवेगळ्या सण-उत्सवांमध्ये नागरिकांनी केंद्र व राज्य सरकारसह महानगरपालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शक्यतो घरीच व साधेपणाने उत्सव साजरे केले आहे. असाच सहकार्य दिपावली सणामध्ये अपेक्षित आहे, असे आयुक्तांनी नमूद केले.
बेफिकीर होऊ नका -
आयुक्त चहल म्हणाले की, दिपावली सणाच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर दुकाने, मंडया, मॉल्स् यासह सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू लागले असून ते योग्य नाही. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने हटवली याचा अर्थ बेफिकीर होवून चालणार नाही. यामुळे महानगरपालिका प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न घालणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध कारवाई करण्यासाठी मार्शल्सची संख्या तिप्पटीने वाढवली आहे. महानगरपालिकेच्या इतर खात्यांमधील अधिकारी-कर्मचारी देखील या कामी नियुक्त करण्यात येत आहेत.
मुंबईतील गर्दीची ठिकाणे आणि गर्दीच्या वेळा शोधून त्यानुसार गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग तैनात केला जात आहे. या सर्व उपाययोजनांमध्ये आवश्यक त्या सर्व ठिकाणी स्थानिक पोलिसांचे सहकार्य घ्यावे. पोलिसांसमवेत बैठका घेऊन स्थानिक स्तरावर नियोजन करावे. स्थानिक स्तरांवरील बिगर शासकीय संस्था व सामाजिक नेते मंडळी यांचेही सहकार्य घेऊन नागरिकांमध्ये प्रबोधन करावे, जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, असे आवाहन चहल यांनी केले.
तसेच, महानगरपालिकेचे संबंधित परिमंडळ सहआयुक्त, उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त यांच्यावर मुख्यत्वे ही सर्व जबाबदारी आहे, असे सांगून सर्व सूचनांचे कसोशीने पालन करण्याच्या सूचनाही चहल यांनी केल्या.
दुसऱ्या लाटीची खबरदारी घ्या -
कोणत्याही स्थितीत कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी सर्व खबरदारी घेणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सरकारच्या प्रयत्नांमध्ये जनतेचे सहकार्य अतिशय मोलाचे आहे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वेळोवेळी केले आहे. एक बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकतो, असा इशारा राज्य टास्क फोर्स समितीनेही दिला आहे. असे घडले तर कोरोना संसर्गाची तीव्रता वाढू शकते. यामुळे गाफील न राहता मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा उपयोग करावा, सुरक्षित अंतर राखावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, साधेपणाने दिपावली उत्सव साजरा करावा, कोरोनाबाधितांना त्रास होवू नये यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा- मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे एक पाऊल पुढे; प्रथम वर्षाच्या प्रवेशाला सुरुवात