मुंबई - वरळी बीडीडी चाळ येथे ३० नोव्हेंबरला गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील ४ जण जखमी झाले होते. ( Worli Gas Cylinder Explosion ) या जखमींवर उपचार करण्यात दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आल्यावर डॉक्टर व नर्सला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ३ जखमींचा मृत्यू झाला. याप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषी डॉ. शशांक झा यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर नर्सला त्रयस्थ चौकशी समिती आणि खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ( Convicted Doctor Removed Worli Gas Cylinder Explosion )
गॅस सिलेंडर स्फोट, ४ जखमी -
वरळी बीडीडी चाळ येथे ३० नोव्हेंबरला एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत जखमी चार जणांना नायर रुग्णालयात सकाळी ६.११ वाजता आणण्यात आले. मात्र, या जखमींवर उपचार करण्यात दिरंगाई करण्यात आली. ४ पैकी ३ जखमींना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान चार महिन्याच्या मुलाचा मंगेश पुरी, त्याची आई विद्या पुरी (२५) आणि वडील आनंद पुरी (२७) या तिघांचा मृत्यू झाला. याचे पडसाद पालिकेत उमटले. या प्रकरणी एका डॉक्टर आणि नर्सला निलंबित करण्यात आले होते.
हेही वाचा - Omicron In Mumbai - मुंबईत ओमायक्रॉनचे ३३ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा पोहोचला ११८ वर
दोषी डॉक्टर बडतर्फ -
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिकेने नायर रुग्णालयातील डेप्युटी डीन यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य चौकशी समिती नियुक्त केली. तसेच त्रयस्थ चौकशी समितीही नियुक्त केली. नायर रुग्णालयातील डेप्युटी डीन यांनी सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात १ डिसेंबरपासून दोषी डॉ. शशांक झा यांना बडतर्फ करण्याचे आणि नर्स प्रीती सुर्वे यांना निलंबित करून त्यांची त्रयस्थ चौकशी समिती आणि खात्याअंतर्गत चौकशी करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार पालिकेने डॉ. शशांक झा यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.
त्रयस्थ समितीचा अहवाल अद्याप बाकी -
दरम्यान, या एकूण प्रकरणाची सखोल चौकशी ७ दिवसांत पूर्ण करण्यासाठी ४ डिसेंबरला डॉ. अजय चंदेनवाले, सहसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रयस्थ समितीने १३ व १४ डिसेंबर रोजी नायर रूग्णालय येथे आपली प्राथमिक चौकशीची सुनावणी पूर्ण केली आहे. त्याचा चौकशी अहवाल अद्याप प्रतिक्षाधिन आहे. हा अहवाल पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यावर संबंधित दोषींवर ठोस व कडक कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.