मुंबई - हेमंत करकरे यांनी काँग्रेस सरकारच्या इशाऱ्यावरुन साध्वी प्रज्ञा सिंहचा छळ केला. दुसरीकडे करकरे हे दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले. हुतात्मा झालेल्या व्यक्तीला महिलांचे शोषण केल्याबद्दल माफ करायचे का असा खळबळजनक सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे प्रमुख इंद्रेश कुमार यांनी मुंबईत केला.
साध्वी प्रज्ञा सिंहने हेमंत करकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबईत इंद्रेश कुमार यांना याबाबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने प्रतिक्रिया विचारली होती. यावर उत्तर देताना इंद्रेश कुमार यांनी करकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.
हेमंत करकरे यांनी एटीएसचे प्रमुख असताना काँग्रेस सरकारच्या इशाऱ्यावरुन साध्वी प्रज्ञा सिंहवर अन्याय केले. तर दुसरीकडे करकरे हे मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. त्यामुळे अगोदर महिलेचे शोषण केल्यानंतर हुतात्मा झालेल्या करकरेंना महिलेंचे शोषण करण्याची परवानगी द्यायची का, असा खळबळजनक सवाल त्यांनी केला.
यावेळी इंद्रेश कुमार यांनी गुंडांनी घरावर केलेल्या हल्ल्यात मूल हुतात्मा झाले, तर ते अभिमानास्पद आहे. मात्र तेच मूल जर आई आणि बायकोला मारहाण करुन त्यांचे शोषण करत असेल, तर त्याला महिलांचे शोषण करण्याची परवानगी द्यायची का अशी पुष्टीही त्यांनी जोडली.