मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता आरोग्यविषयक आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालया कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. पहिल्याच दिवशी राज्यातून हजारो ई-मेल नियंत्रण कक्षाच्या मेलवर आले आहे. त्यात सर्वाधिक मेल हे केवळ सूचना आणि उपाययोजनांवर असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील जनतेला कोरोना संदर्भात माहिती आणि मार्गदर्शन मिळावे, म्हणून मंत्रालयात सहाव्या मजल्यावर हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 3 दिवसांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या कक्ष सोमवारी कार्यरत झाले. यातही अनेक मेल हे त्याच-त्याच सूचनांचे आणि एकमेकांकडून फॉरवर्ड केलेले असल्याचेही दिसून आले आहे. तर उर्वरित उद्योग आणि खासगी क्षेत्रातील रोजगार बंद झाल्याच्या संदर्भात अनेकांनी आपल्या तक्रारी करोना नियंत्रण कक्षाच्या चार ई-मेलवर नोंदविण्यात आली, अशी माहिती नियंत्रण कक्षाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. .
हेही वाचा - ' जागतिक अर्थव्यवस्थेच्या चलनवलनावर कोरोनाचा कायमस्वरुपी होणार परिणाम'
कोरोना नियंत्रण कक्षाची मुख्य जबाबदारी गगराणी यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी मनोज पाटील, सनदी अधिकारी राजीव जलोटा, प्राजक्ता लवंगारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून महापालिका, नगरपालिका, जिल्हा आणि तालुका स्तरावरील घडामोडी आणि त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवला जात आहे. त्यासाठीची सुरूवात झाली असल्याची माहितीही गगराणी यांनी दिली.
असे आहेत ई-मेल -
सरकारच्या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय यंत्रणांना सहकार्य, सहयोग करण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी ccrmaharashtra.aid@gmail.com तर शासकीय उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसायांचे काही प्रश्न यासाठी ccrmaharashtra.ind@gmail.com हा ईमेल देण्यात आला आहे. तर दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न अथवा काही तक्रारी असल्यास ccrmaharashtra.ind@gmail.com आणि शासनाने दिलेल्या निर्देशांबद्दल, आखलेल्या धोरणांच्या अंमलबजावणीबद्दल काही स्पष्टीकरण हवे असल्यास ccrmaharashtra.policy@gmail.com हा इमेल देण्यात आला आहे.