मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीच्या कार्यालयासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार, विविध सेलचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाला आतापर्यंत तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा अदानीचा नसून जनतेचा आहे, असे असतानाही मोदी सरकार मौन बाळगून आहे. संसदेत विरोधक चर्चा करण्याची मागणी करत आहेत. परंतु सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. त्यामुळे केंद्रसरकाच्या विरोधात प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आता रस्त्यावर आक्रमक होणार आहे. देशभरात हे आंदोलन होणार आहे. महाराष्ट्रात देखील हे आंदोलन प्रखरतेने करण्यासाठी संपूर्ण काँग्रेस नेतेमंडळी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आंदोलनात काँग्रेस नेते पदाधिकारी सहभागी : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुण्यातील आंदोलनात सहभागी होत आहेत, तर साताऱ्यामध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यवतमाळमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार, नागपूरमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर, चंद्ररपूरमध्ये माजी मंत्री सुनिल केदार, गोंदिया मध्ये माजी मंत्री नितीन राऊत, औरंगाबादमध्ये माजी मंत्री अमित देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान ठाणे, चंद्रकांत हंडोरे नवी मुंबई, आमदार कुणाल पाटील जळगाव, आमदार प्रणिती शिंदे लातूर, बसवराज पाटील सोलापूर, माजी मंत्री विश्वजीत कदम पिंपरी चिंचवड यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालयी होत असलेल्या आंदोलनात काँग्रेस नेते पदाधिकारी सहभागी होत आहेत.
केंद्रसरकारच्या विरोधात आंदोलन : हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे अदानी समुहाला मोठे नुकसान झाले आहे. त्यातच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी सरकारी संस्थेने अदानी समुहात केलेल्या गुंतवणुकीमुळे या दोन्ही संस्था अडचणीत येतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. हा देशासाठी गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे सुरू असलेल्या आर्थिक अधिवेशनात केंद्र सरकारने याबाबत चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची आहे. मात्र विरोधकांच्या या मागणीला केंद्र सरकार मान्य करत नाही. त्यामुळे या विरोधात देशभरात आज काँग्रेसकडून केंद्रसरकारच्या विरोधात एसबीआय व एलआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन केली जाणार आहेत.