मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आज काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईतील अर्णबच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली आहे. अर्णब आणि बार्कचे माजी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या कथित चॅट विरोधात काँग्रेसतर्फे हे आंदोलन केले जात आहे. तसेच, अर्णब गोस्वामीप्रकरणी भाजप गप्प का, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
व्हॉट्सअप चॅटमुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न
'अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅटमुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करण्यात यावी,' या मागणीसाठी मुंबई काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. वरळी परिसरात असलेल्या अर्णब यांच्या कार्यालयावर काँग्रेसकडून मोर्चाही काढण्यात आला.
चॅट संदर्भात काँग्रेसचा आक्षेप
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातीळ बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. हा हल्ला होण्याच्या तीन दिवस आधीच अर्णब गोस्वामीला ही माहिती कशी मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. अर्णब गोस्वामी यांनी गोपनीयतेचा भंग केला असून हा देशद्रोह असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले असून या आंदोलनात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेस कार्यध्यक्ष चारणसिंह सप्रा, आमदार इयान सिद्दीकी, काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड उपस्थित होते.