मुंबई - निधीच्या बाबतीत काँग्रेस मंत्र्यांनी ( Congress Minister on Fund ) जी भूमिका मांडली त्यात काहीही गैर नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अलर्ट करण्यात चुकीचे काय? असा सवाल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congree State President Nana Patole ) यानी उपस्थित केला आहे. तर टीपु सुल्तान यांचे नाव उद्यानाला देण्याचेही त्यांनी समर्थन केले.
संविधानाने सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, समानतेचा हक्क दिला. पण भाजपा सरकारच्या काळात लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत. हा धोका लक्षात घेऊन देशाला मोठ्या संघर्ष व बलिदानाने मिळालेले स्वातंत्र्य व संविधान अबाधित राखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जागरुक रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन या मुख्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तारिक अन्वर यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
भाजपा धर्मांधतेचे वातावरण तयार करत आहे -
स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारचा आमच्यावर दबाव आहे, असे सांगत असतील तर संवैधानिक व्यवस्था धोक्यात आली आहे याचेच हे द्योतक आहे. मागील सात वर्षात देशातील चित्र बदलले आहे. देश धोक्यात येतोय, देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे त्यामुळे आपण सावध रहायला हवा. कोरोना काळात काळजी घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानुसार शाळा, बाजार, सगळे बंद केले होते. देशाच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला जर मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला तर भाजपला त्याचा त्रास का होतो?, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उपस्थित केला. तर जनतेचे मूळ प्रश्न बाजूला ठेवण्यासाठी भाजपा धर्मांधतेचे वातावरण तयार करत आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.
उद्यानाला टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासून -
उद्यानाला नाव देण्याचे काम महानगरपालिकेचे आहे. मंत्री अस्लम शेख हे त्या उद्यानाचे नामकरण करायला गेले नाहीत तर त्यांच्या निधीतून या उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे त्याचे ते उद्घाटन करणार आहेत. त्या उद्यानाला टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासून आहे पण भाजपा विनाकारण त्याला धार्मिक रंग देत आहे.
कॉंग्रेसच्या मंत्र्यांची भूमिका योग्यच -
कॉंग्नेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, नितीन राऊत आणि यशोमती ठाकूर यांनी निधीच्या संदर्भात व्यक्त केलेली नाराजी योग्यच असल्याचे समर्थन पटोले यांनी केले. निधीच्या बाबतीत काँग्रेस मंत्र्यांनी जी भूमिका मांडली त्यात काहीही गैर नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अलर्ट करण्यात चुकीचे काय? असा सवाल करीत देवेंद्र फडणवीस यांच्या काळात काय झालं, धिंगाणाच सुरू होता, असा टोलाही पटोले यांनी लगावला. तर "आज सत्तेत असलेले लोक स्वातंत्र्य चळवळीची थट्टा करत आहेत. काँग्रेसने धर्मनिरपेक्ष सरकार देऊन देश उभा केला. देशाची ही एकता व अखंडताच धोक्यात आलेली आहे. देश उभारणीतील काँग्रेसचे योगदान ओळखा व महाराष्ट्र आणि देशात काँग्रेसची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्याचा संकल्प करा," असे आवाहन तारिक अन्वर यांनी यावेळी केले.