मुंबई - औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले जावे, या मागणीसाठी मराठा संघटनासह विरोधकांकडूनही मागील काही दिवसात ठाकरे सरकारला धारेवर धरण्यात आले आहे. नामांतरासाठी शिवसेनेची वेगळी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या यासाठी भूमिका स्पष्ट झाल्या असतानाच आज त्याच पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत नामांतराच्या मुद्द्याला बगल देण्यात आली. यावर चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षाच्या प्रमुख मंत्र्यांची एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आज पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात शिवसेना नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई आदी नेते उपस्थित होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नगर विकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मात्र दांडी मारली.
विविध महामंडळांचे सदस्य निवड
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, आमच्या महाविकास आघाडीच्या समनव्य समितीची बैठक झाली. ती दर मंगळवारी होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विविध महामंडळांचे सदस्य निवड हा विषय येत्या आठवड्यात मार्गी लागणार असून त्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हा सदस्यच्या नियुक्तीवर अंतिम निर्णय होणार असल्याची माहितीही थोरात यांनी दिली.
अध्यक्षपद आणि सदस्यपदावर कोणताही निर्णय नाही
आज झालेल्या या बैठकीला महाविकास आघाडीतील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित नसल्याने रखडलेल्या महामंडळांच्या अध्यक्षपद आणि सदस्यपदावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहितीही समोर आली आहे. यामुळे पुढील आठवड्यात केवळ जिल्हा स्तरावरील विविध प्रकारच्या समित्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. तर महामंडळाच्या अध्यक्ष, सदस्यांच्या संदर्भात पुढील बैठकीत हा विषय पुन्हा चर्चिला जाण्याची शक्यता आहे.