मुंबई - राज्यात धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत अनेकदा चर्चा केल्या. परंतु, त्यांना आघाडीत यायचे नाही. आम्ही त्यांच्याशी 3 वेळा चर्चा केली असून त्यांनी आपली सकारात्मक भूमिका मांडली नाही. जी मांडली ती आम्हाला मान्य नव्हती. त्यामुळे आता वंचितसोबत चर्चा करण्याचे आमचे दरवाजे आता बंद झाले असल्याचा खुलासा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी आज मुंबईत केला.
हेही वाचा - राममंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे - उद्धव ठाकरे
राज्यात शेतकरी कामगार पक्ष आणि इतर आंबेडकरी घटकांसोबत चर्चा सुरू आहे. त्यातून आमच्यासोबत अनेक पक्ष येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जागावाटपाचाही विषय मार्गी लागला असल्याचे ठाकरेंनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत महाआघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागांवर लढण्याचे ठरले आहे. तर मुंबईत राष्ट्रवादीला 6 जागा देण्याचे ठरले आहे, त्यानंतर मुंबईत इतर पक्षांसोबत बोलणी करत असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. तसेच समाजवादी पार्टीसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांचा 1 ते 2 जागांचां विषय आहे, तो ही सुटेल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
- मनसेसोबत चर्चा करू -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाआघाडीत येण्यासाठी अजून कोणीताही प्रस्ताव आला नाही, तसा आला तर आणि ते जर निवडणूक लढवत असतील तर पुढे चर्चा होईल, असेही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - विधानसभा 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी 125 जागा लढवणार
- भाजप-सेनेकडून राम मंदिराच्या नावाने राजकारण -
राममंदिराच्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावर विचारले असता, ठाकरे म्हणाले की, सेना आणि भाजपकडून राम मंदिराच्या नावाने राजकारण केले जात आहे. राज्यात प्रचंड मोठे प्रश्न आहेत. ते सोडवण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी झाल्याने राज्यातील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवून मुळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा भाजप-सेना प्रयत्न करत आहे.