मुंबई - राज्यात १ मेपासून १८ ते ४५ वर्षांपर्यंतचे लसीकरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी आमदार निधीतून १ कोटी रूपये लसीकरणासाठी वापरावेत, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट देखील केले आहे.
आमदार निधीतून १ कोटी रूपये लसीकरणासाठी -
राज्यात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. मुंबई शहरासह उपनगरात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ४५ वयोगटावरील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देण्याचे धोरण शासनाने आखले आहे. मात्र, लस मोफत न मिळाल्यास गरीब व दुर्बल घटकांतील व्यक्ती वंचित राहतील. ही बाब विचारात घेऊन, मुंबादेवी विधानसभा आमदार संघातील १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींच्या मोफत लसीकरणासाठी काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी पुढाकार घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांना आमदार निधी चार कोटी रूपयांपर्यंत वाढवून दिला आहे. त्यातील एक कोटी रूपये हे कोरोना संदर्भात वापरण्याची मुभा दिली होती. त्यानुसार आपला एक कोटींचा निधी लसीकरणासाठी वापरावा अशी विनंती आमदार अमीन पटेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
मोफत लसीकरणासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा -
१८ वर्षांवरील नागरिकांच्या मोफत लसीकरणाबाबत राज्याला धोरण ठरवायचे आहे. कॅबिनेटमध्ये यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी स्पष्ट केले होते. तसेच ज्यांना परवडेल त्यांनी लस विकत घ्यावी, असा सल्लाही दिला होता. राज्यातील आमदारांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या मोफत लसीकरणासाठी पुढाकार घेतल्यास सरकारवर भार कमी होईल, असे आमदार पटेल म्हणाले.