मुंबई - कोरोनाच्या महामारीत स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता एसटी महामंडळाचे कर्मचारी लॉकडाऊन काळात सेवा देत आहेत. मात्र, महामंडळाने एसटीचा कणा समजणाऱ्या एक लाख कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचे वेतन अद्यापही दिले नाही. त्यामुळे या संकटकाळात उदरनिर्वाह कराचा कसा, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना तत्काळ वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पोलीस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार आदी सरकारी यंत्रणा देवदूत म्हणून काम करीत आहे. तसेच त्यांना अखंडित एसटीची सेवा देण्याचे काम एसटी महामंडळातील कर्मचारी करीत आहेत. फक्त मुंबई, ठाणे आणि पालघरला विभागातच एसटी महामंडळ सेवा देत नाही. तर राज्यातील विविध जिल्हयातून अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याचा सीमेपर्यत पोहचविण्याचे काम किंवा बाहेर राज्यातून महाराष्ट्रातील जनतेला घरी आणण्याचे काम एसटीचे कर्मचारी करीत आहेत.
गेल्या महिन्यात राज्यस्थानातील कोटा येथे अडकलेले विद्यार्थी किंवा ऊसतोड कामगार असो, त्यांनासुद्धा कोरोनाच्या या संकटात गावापर्यंत पोहोचवण्याचे काम एसटी कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे हे कोरोना योद्धे आज अत्यावश्यक सेवेत मोडत आहेत. म्हणून राज्य सरकारने आणि एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन तत्काळ वेतन अदा करावे. त्यासाठी राज्य सरकारने एसटीची सवलतीची प्रतीपूर्ती म्हणून देय असलेली 547 कोटींची रक्कम एसटीकडे तत्काळ वर्ग करावी. म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडचण येणार नाही, असेही आमदार जगताप यांनी म्हटले आहे.