मुंबई : हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अडचणीत आलेल्या गौतम अदानी यांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. असे असताना काँग्रेसचा महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गौतम अदानी यांनी भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीवर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी त्यांची प्रतिक्रिया देखील दिली आहे.
काँग्रेस मागणीसाठी आग्रही कारण : दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, गौतम आदानी हे पवार साहेबांना आज त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी मुंबईला जाऊन भेटले, भेटू शकतात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की, पवार साहेबांनी हे स्पष्ट केलेले आहे की, विरोधी पक्षांना जर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी संयुक्त संसदीय समिती आवश्यक वाटत असेल, तर ते केले पाहिजे. काँग्रेस या मागणीसाठी आग्रही यासाठी आहे कारण की, याच्यामध्ये सुरक्षेचे प्रश्न संबंधित आहेत. सामान्य माणसाला रोज त्याला जो त्रास होतो त्याच्याशी संबंधित आहे.
कोणी गुंतवणूक केली : क्रोनी कॅपिटलिस्म ज्या पद्धतीने सगळे काही अदानीसाठी केले आहे. हे तिन्ही प्रश्न मोदी यांच्यात गुंतलेले आहे. जे कोर्टामध्ये सुटू शकत नाहीत. मात्र संयुक्त संसदेत समितीपुढे आणावे लागतील. सुरक्षेच्या संबंधांमध्ये वीस हजार कोटी पोर्ट आहे, एअरपोर्ट आहे, यात कोणी गुंतवणूक केली हे माहीतच नाही. ते विस हजार कोटी कोणी गुंतवले, हे देशाला किंवा जनतेला माहीत असायला नको का? असा सवाल ही लोंढे यांनी उपस्थित केला आहे.
फक्त अदानीच सक्षम आणि सर्वज्ञ : तुम्हाला पोर्ट, एअरपोर्ट, मीडिया, माईन्स, पूल, पावर येतो. सगळे तुम्हाला एकट्यालाच येतात, दुसऱ्या कोणाला काहीच येत नाही का? याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते कुठेतरी देशाच्या सुरक्षेसोबत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत कॉम्प्रमाईज झालेले आहे. त्यामुळे नक्की तुम्ही कोणाला जाऊन भेटले तरी, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ही द्यावीच लागेल. याची चौकशीची करावीच लागेल आणि सत्य देशापुढे आणावेच लागेल. काँग्रेस याच्यासाठी शंभर टक्के आग्रही असल्याचेही लोंढे यांनी स्पष्ट केले.