मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ या सभेला परवानगी देण्यावरून रंगलेल्या नाट्याला अखेर महाविकास आघाडीला सशर्त परवानगी मिळाली आहे. मात्र ही परवानगी देण्यासाठी राज्य सरकारने प्रशासनाच्या अडून महाविकास आघाडीची अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. ते आज मुंबईत बोलत होते.
भाजपाला पराभवाची चाहूल : दरम्यान भारतीय जनता पक्षाला आता पराभवाची चाहूल लागली असून त्यांनी महाविकास आघाडीच्या सभा वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. असे सांगत तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी, महाविकास आघाडीच्या सभा होणारच असा दावा लोंढे यांनी केला आहे. लोंढे म्हणाले की, तुम्हाला प्रशासनाच्या अडून महाविकास आघाडीच्या सभा थांबवता येणार नाही. महाविकास आघाडीच्या बाजूला पूर्ण जनता असल्यामुळे तुमची आता घाबरगुंडी उडालेली आहे असे लोंढे म्हणाले.
भाजला भीती : महाविकास आघाडीच्या सभामुळे भाजपला समोर पराभव दिसत आहे. भाजपला पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी प्रशासनाच्या आड रडीचा डाव सुरू केल्याचा आरोप लोंढे यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अडून खेळण्यापेक्षा दम असेल तर मर्दासारखे मैदानात येऊन लढा असे आव्हान, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपला दिले आहे. यापुढे महाविकास आघाडीच्या सभांना परवानगी नाकारून अथवा त्या अडवून दाखवा असा दम देखील त्यांनी शिंदे भाजप सरकारला दिला आहे. महाविकास आघाडीच्या सभा होणार म्हणजे होणारच असा दावाही लोंढे यांनी केला आहे.
2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा : छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीची सभा 2 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. संभाजीनगरातील किराडपुरा परिसरात रामनवमीच्या दिवशी दोन गटात वाद निर्माण झाल्याने दंगल पेटली होती. यात एका जणाचा मृत्यू देखील झाला होता. मात्र, हा मृत्यू नेमका कशाने झाला याची पुष्टी पोलिसांनी केलेली नाही. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. दोन गटात मारामारी झाल्याने शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
सभेला परवानगी : त्यामुळे महाविकास आघाडीच्या सभेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे? पोलीस या सभेला परवानगी देणार की नाही? असा प्रश्नही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. या सभेला परवानगी द्यायची की नाही, हा पोलिसांचा निर्णय आहे. पोलिसांनी नकार दिल्यास सभा होणार नाही, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. तर संभाजीनगरची सभा होणारच असा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. दावे-प्रतिदावे सुरू असतानाच पोलिसांनी महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या परवानगीमध्ये महाविकास आघाडीला एकूण 15 अटी घातल्या आहेत.
हेही वाचा - Security Devotees Clash in Shirdi : साई संस्थानचे सुरक्षारक्षक आणि भाविक एकमेकांना भिडले