मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मुंबईमध्ये संयुक्त बैठक पार पाडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीनिशी विधानसभेच्या निवडणुकीला समोरे जाणार असल्याचे जयंत पाटलांनी यावेळी स्पष्ट केले.
बाळासाहेब थोरात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची पहिली बैठक आज मुंबईत पार पडली.
मित्रपक्षांसोबत लवकरच चर्चा करणार असून मनसेला आघाडीत घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे देखील जंयत पाटलांनी सांगितले. जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नसून पूर्ण चर्चेअंती जागा वाटप जाहीर केले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, आजच्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली. बैठकीत फॉर्मुल्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. कोणाची ताकद किती हा विषय नाही. आघाडीचा मुख्यमंत्री बसवायचा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या कोणाला बरोबर घ्यायचे, यावर नंतर निर्णय होईल, मनसेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, जिंकणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल, असेही थोरात यांनी सांगितले.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी नेते उपस्थित होते.