मुंबई - राज्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जमल्यानंतर आता आघाडीतील मित्रपक्षांचे मत जाणून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे यांच्यासह समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, रिपाई नेते जोगेंद्र कवाडे, शिवसंग्रामचे नेते अनिल गोटे आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू राज्यात सत्ता स्थापन करताना मित्रपक्षांना कोणत्याही ठिकाणी डावलले जाऊ नये आणि त्यांचे मत विचारात घेतले जावे, यासाठी ही बैठक घेतली जात आहे. या बैठकीत काही मित्रपक्षांना मंत्रिपदाच्या जागा देता येतील काय अथवा त्यासाठीचे त्यांचे मत काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून केला जाणार आहे. त्यानंतरच आज सायंकाळी काँग्रेसचे नेते विधिमंडळ नेत्याच्या निवडीचा विषय मार्गी लागणार असून सायंकाळपर्यंत सत्ता स्थापन करण्यासाठीचा निर्णय जाहीर होईल, असे संकेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीपूर्वी दिले. या बैठकीत आमचे मत विचारात घेतले जाणार असून त्यानंतरच जी काही माहिती मिळेल, ती मी देईन असे यावेळी समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांनी सांगितले.