मुंबई - देशात ज्या ठिकाणी भाजपाचे राज्य आहे त्या ठिकाणी महिला आणि दलितांवर अत्याचार होत असून त्याविरोधात आम्ही हे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आणि हक्कांची जाणीव करून देणार आहोत, अशी ग्वाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. दादर चैत्यभूमी येथे आज काँग्रेसकडून भाजपशासित राज्यात होत असलेल्या दलित आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे मंत्री, माजी आमदार, माजी खासदार तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाच्या राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही हे आंदोलन येथे केले आहे. संपूर्ण देशामध्ये काँग्रेस हे आंदोलन करत असल्याचे थोरात यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समतेचा संदेश दिला. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय संविधान बनले. त्यांच्या पवित्र अशा चैत्यभूमी या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. ही समतेची आणि न्यायाची भूमी आहे. यामुळे आम्ही या भूमीतून सगळ्या समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याची यातून प्रयत्न करणार असल्याचे थोरात म्हणाले.
केंद्राने आणलेला कृषी कायदा हा केवळ शेतकऱ्यांना नाही तर सर्वसामान्य लोकांवर होणार आहे. गरिबांचा माल स्वस्तात घेऊन त्यांचे साठे करणार आणि तो महागात विकला जाणार आहे. साठेबाजांना हाताशी धरून त्यांचे भले करण्याचा मोदी सरकारचा हेतू असल्याचा आरोप थोरात यांनी केला.
आम्ही गप्प बसणार नाही -
मुंबई ही कामगार कायद्याची जननी आहे. नारायण मेघाजी लोखडे यांनी कामगारांना जागे करण्याचे काम केले. कामगारांना हक्क मिळवून दिले, असे अनेक कायदे केंद्र सरकार रद्द करण्याच्या तयारीत असून त्याविरोधात काँग्रेस गप्प बसणार नाही, असेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.
जैसी करणी वैसी भरणी -
रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबाबत विचारले असता थोरात म्हणाले की, जिथे चुकीचे होते, तिथे मुंबई पोलीस बरोबर काम करत आहेत. त्यामुळे 'जैसी करणी वैसी भरणी' अशा शब्दात थोरात यांनी गोस्वामी यांच्या अटकेचे समर्थन केले.