मुंबई - दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना, सावंत न्यायालयात हजर होत नसल्याचा आरोप मिलंद देवरा यांनी केला आहे. तर राज्य सरकारकडून हे गुन्हे मागे घेण्याची वाट पाहत असल्याचे सांवत यांनी सांगितले आहे. त्यामुळे विद्यमान खासदार असलेले सावंत आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत का? असा सवाल काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी उपस्थित केला आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप प्रचारात कायदेशीर लढतही होताना दिसत असून एकमेकांच्या तक्रारी करण्यात येत आहेत. एकीकडे धार्मिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत देवरा यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर सावंत यांच्यावर १३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही सावंत न्यायालयात हजर होत नसल्याचे देवरा यांनी सांगितले आहे.
सरकारी कामात व्यत्यय आणणे, सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे, शासकीय मालमत्तेची नासधूस करणे, अशा प्रकारचे सावंत यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात न्यायालयाने १६ वेळा समन्स पाठवले असूनही न्यायालयात हजर झाले नाहीत. तर आपल्यावरील गुन्हे सरकार मागे घेणार असल्याचे सावंत यांनी न्यायालयाला कळवले आहे. याचा अर्थ ते पदाचा दुरुपयोग करत आहेत का? असा सवाल देवरा यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार उमेदवाराने आपल्यावरील दाखल गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रात ३ वेळी देणे बंधनकारक आहे. मात्र, सावंत यांनी एकदाही वर्तमानपत्रात याबाबत जाहिरात दिलेली नाही. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे देवरा यांनी सांगितले.
धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा देवरा यांच्यावरही दाखल झाला आहे. मात्र, हा गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे देवरा यांनी सांगितले आहे. यासंदर्भात शिवसेनेचे उमेदवार सावंत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.