मुंबई - राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. लोकलमध्ये उभे राहून प्रवास केल्यास प्रवाशांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. लोकल प्रवासाबाबतची नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे. तुर्तास राज्य सरकाराने सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासाबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे.
नव्या नियमानुसार करा प्रवास -
राज्यातील लोकल, लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवास करता येणार नाही. तसेच प्रवासादरम्यान मास्क घालणे अनिवार्य केले आहे. प्रवासी कोरोना नियमांचे पालन करत आहेत की नाही, हे पाहण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणार आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी प्रवाशांना 72 तासांपूर्वीचा कोरोना चाचणी अहवाल बाळगणे आवश्यक आहेत. हा नियम अंतर्गत रेल्वे गाड्यांसाठी सुद्धा लागू करण्यात आला आहे. यापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या राज्यांतर्गत धावणाऱ्या रेल्वे गाड्यावर कसलाही नियम लागू नव्हता. फक्त देशांतर्गत रेल्वे गाड्यांची तपासणी केली जायची. मात्र, आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने सरसकट सर्व रेल्वे गाड्यांवर हे नियम लावलेले आहेत.
लोकलच्या प्रवाशांमध्ये संभ्रम -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी कार्यालयांना घरूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांना बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, इतर क्षेत्रातील प्रवाशांनी लोकल प्रवास करायचा की नाही, असा प्रश्न आता पडला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला राज्य सरकाराकडून रात्री उशिरापर्यंत नियमावलीची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
1 हजार 200 प्रवासी क्षमता -
सध्या मध्य रेल्वेच्या 1 हजार 774 फेऱ्यांपैकी 1 हजार 685 आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 1 हजार 333 पैकी 1 हजार 200 लोकल धावत आहेत. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बारा डब्याची लोकल धावत आहे. 12 डब्याच्या लोकलमध्ये प्रवासी क्षमता 1 हजार 200 आहे. त्यामुळे आता जेवढी आसन क्षमता आहे, तेवढेच प्रवासी बसू शकतात. लोकलमध्ये उभ्याने प्रवास करू शकत नाही, असे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे. लोकलमध्ये उभे राहून प्रवास केल्यास कारवाई करण्यात येईल किंवा लोकलमध्ये उभ्याने प्रवास करू शकत नाही, यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही.
नियमांचे सर्रास उल्लंघन -
कोरोनाची पहिली लाट आली असताना राज्य सरकारने लोकल प्रवास करताना सामाजिक अंतर राखण्यासाठी 1 हजार 200 आसन क्षमता असलेल्या लोकलमध्ये 700 प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा दिली होती. राज्य सरकारने रेल्वेला यासंबंधी निर्देश दिले होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने प्रत्येक आसनावर सामाजिक अंतर राखण्यासाठी 'येथे बसू नका' असे पोस्टर लावले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यासमोर प्रवाशांकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत होते. तरी सुद्धा लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलीस बघ्याची भूमिका घेत होते.
कार्यालयीन वेळेत बदल करावा-
लोकल प्रवासात जशी-जशी गर्दी वाढू लागली. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने, रेल्वे पोलिसांनी नवनवीन उपाययोजना आणणे आवश्यक होते. प्रवाशांनी मास्क घालून प्रवास करावा यासाठी लोकलमध्ये महानगरपालिकेचे क्लीनअप मार्शलचे पथक फिरत होते. त्याप्रमाणे लोकलमधील गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे पोलिसांचे पथक, भरारी पथक तैनात केले पाहिजे होते. 1 फेब्रुवारीपासून गर्दीच्यावेळी प्रवाशांचे ओळखपत्र तपासणे बंदच करण्यात आले. यासह कार्यालयीन वेळा बदलणे, 15 डब्याची लोकल सेवा चालवणे याबाबी प्रशासनाने तत्काळ करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे (महासंघ) अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.
प्रत्येक प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करा-
मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही बाब अत्यंत चिंतेची आहे. आम्ही शासनाला एक निवेदन दिले आहे. शासकीय आणि खासगी कार्यालयांच्या वेळेत बदल करावेत आणि कर्मचाऱ्यांची क्षमता 50 टक्के करावी. तसेच खासगी कार्यालये आणि शासकीय कार्यालयातील साप्ताहिक सुट्ट्यांमध्ये बदल करावेत. लोकल प्रवाशांना प्रवासासाठी दिलेल्या वेळेत प्रवास करण्याची सक्ती करावी. लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे स्थानकावर व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या रेल यात्री परिषदचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केल्या आहेत.
हेही वाचा - राज्यात कोरोनाचा विस्फोट! रविवारी ५७ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद; २२२ मृत्यू