मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टसच्या विद्यार्थ्यांनी कलिना कॅम्पसमध्ये सोमवारी आंदोलन केल्यानंतर, विद्यापीठाने संचालक योगेश सोमण यांना तातडीने रजेवर पाठविण्यात येईल असे पत्र विद्यार्थ्यांना दिले. मात्र, तीन दिवस उलटत नाही तोच विद्यापीठांनी आपली भूमिका बदलून सोमण हे रजेवर नाही तर सुट्टीवर गेले असल्याचे आज एक पत्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांना दिल्याने या प्रकरणात नवीन वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - कृषिक २०२० महोत्सव : 'त्या' सत्कारावर शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
सोमण हे 13 जानेवारीपासून रजेवर असल्याचे पत्र कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. यामुळे येत्या काळात विद्यापीठाच्या या भूमिकेवरून विद्यार्थी संघटना सोबतच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोमण यांनी सोशल मिडियावर व्हिडीओ अपलोड केला होता. यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. विभागाने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम दिलेला नाही. कोणताही विषय शिकवत असताना त्याचे प्रात्यक्षिक योग्य प्रकारे शिकविले जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना विषय पूर्णपणे कळत नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता. याप्रकरणी संचालकांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. अखेर रात्री बाराच्या सुमारास विद्यापीठाने विद्यार्थ्यांना लेखी पत्र दिले. या पत्रात सोमण यांना तात्काळ रजेवर पाठविण्यात येत आहे. असे स्पष्टपणे म्हटले आहे. सोमण यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्यात आल्याचे समजताच भाजपा आमदार अशिष शेलार यांनी या कारवाईला आक्षेप घेतला. यावरून राजकारण तापले असतानाच आज गुरूवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने सोमण यांच्यावरील कारवाई राजकीय दबावातून झाल्याने ती रद्द करण्याची मागणी केली.
कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी सोमण हे 13 जानेवारीपासून रजेवर आहेत. त्यांचे रजेचा अर्ज मंजूर करण्यात आला असल्याचे, लेखी पत्र अभाविपच्या शिष्टमंडळाला दिले आहे. याबाबत कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर आणि कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्याशी वारंवार संपर्क करण्यात आला. परंतू त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई अध्यक्ष मोहन भिसे यांनी सांगितले की, प्रा योगेश सोमण हे सक्तीच्या रजेवर नाहीत ते पहिल्या पासून सुट्टीवर, गेले आहेत. त्यासाठी आम्हालाच विद्यापीठांनी पत्र दिला आहे.
प्रा योगेश सोमण यांच्या वरील कारवाई राजकीय द्वेषातून असल्याने ती तत्काळ रद्द करावी, तसेच मागील पाच वर्षातील प्राध्यापक नियुक्ती व विभागाच्या कारभाराची चौकशी व्हावी, अशा आम्ही मागणी केली असल्याचे भिसे म्हणाले.
हेही वाचा - 'चंद्रकांत पाटलांना सत्ता गेल्याच्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो'