मुंबई - पुणे ‘स्मार्टसिटी’ अंतर्गत होणारी कामे दर्जेदार तसेच मुदतीत पूर्ण होतील याची दक्षता घ्या. लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार अंमलबजावणी करा. हे करताना पुणे 'स्मार्ट सिटी'चे रँकिंग राष्ट्रीय पातळीवर कसे सुधारेल यासाठीही आपला प्रयत्न असला पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
'पुणे स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'च्या 'स्मार्टसिटी ॲडव्हायझरी फोरम'ची चौथी बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती सभागृहात आयोजित या बैठकीला व्हिसीव्दारे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार चेतन तुपे, आमदार सुनिल टिंगरे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त रुबल अगरवाल यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे योग्य प्रकारे नियोजन करावे. स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची कामे दर्जेदार होण्याकडे लक्ष द्यावे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु करण्यात आलेली ‘कमांड कंट्रोल रुम’ अधिक चांगल्याप्रकारे कार्यान्वित करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. ‘कोरोना’ संकटाचा सामना करत असताना स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असणाऱ्या सर्व प्रकल्पांची कामे मुदतीत पूर्ण करावीत. तसेच देशपातळीवर पुणे स्मार्ट सिटीचे रँकींग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी पुणे स्मार्टसिटी अंतर्गत सुरु असणाऱ्या कामांचे सादरीकरण केले.