मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मुल्यमापन पद्धतीमुळे कमी गुण पडले. त्यामुळे राज्यभरात मोठा गदारोळ झाल्यानंतर त्या कमी पडलेल्या गुणांची पुढील शैक्षणिक वर्षांत सुधारणा करण्यासाठी आणि केंद्रीय मंडळाच्या शाळांसोबत बरोबरी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आज इयत्ता नववी ते बारावीच्या विषयरचना व मुल्यमापन पद्धतीचा पुनर्विचार करण्यासाठी तब्बल 25 जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष असणार असून त्यानंतर विद्या प्राधिकरण, बालभारती, शिक्षण संचालक आणि राज्य शिक्षण मंडळाचे 4 सदस्य आणि उर्वरित मुंबई पुण्यातील माध्यमिक शाळा आणि इतर कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांचा या समितीत समावेश असणार आहे.
ही समिती 2019-20 या शैक्षणिक वर्षांसाठी केंद्रीय मंडळाच्या सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळाचा आणि राज्य शिक्षण मंडळाच्या विषय योजना आणि मुल्यमापन पद्धती याचा अभ्यास करून येत्या 10 दिवसांच्याआत आपला अहवाल सादर करणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या अभ्यासक्रम व मुल्यमापन पद्धतीत बदल केल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना गुण कमी मिळाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यात शिक्षण मंडळाने दहावीच्या या विषय योजनेत पूर्व ज्ञानावर आधारीत म्हणजेच गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयासाठी नववीतील अभ्यासक्रमावर आधारीत २० गुणांचे प्रश्न नववीच्या लेखी परीक्षेत विचारले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुण कमी झाले होते.