मुंबई: एखादा अधिकारी कर्मचारी आपल्या वरिष्ठांना नेहमीच आदरपूर्वक सर, साहेब बोलतो. मुंबई महापालिकेचे आयुक्त व गेले वर्षभर प्रशासक म्हणून काम बघणारे इकबाल सिंग चहल हे सुध्दा "सर" हा शब्द सातत्याने वापरतात. आज तर त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात अवघ्या १३ मिनिटाच्या आपल्या भाषणात "सर" हा शब्द तब्बल ११८ वेळा वापरला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सर बोलून आयुक्तांनी कार्यक्रमादरम्यान चांगलेच खुश केल्याचे दिसून आले.
काय होता कार्यक्रम: महापालिकेच्यावतीने मुंबईचे सुशोभीकरण करण्यासाठी ५०० कामांचा समावेश असलेला विशेष प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे. त्यामध्ये आता अतिरिक्त ३२० कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांचे भूमिपूजन तसेच मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण अंतर्गत एकूण ५२ किलोमीटर लांबी असलेल्या १११ रस्त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ आणि टिळक नगर, नेहरु नगर व सहकार नगरातील मलनिस्सारण वाहिन्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (दिनांक २६ फेब्रुवारी २०२३) चेंबूर (पश्चिम) मध्ये टिळक नगर परिसरातील लोकमान्य टिळक क्रीडांगण येथे संपन्न झाले. त्यावेळी आयुक्त प्रास्ताविक करताना बोलत होते.
सर बोलून केले खुश: राज्यात माहाविकास आघाडीची सत्ता असताना आयोजित केलेल्या कार्यक्रमात पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन पर्यावरण व पालक मंत्री आदित्य ठाकरे यांना कार्यक्रमात सर म्हणून उल्लेख करायचे. मात्र राज्यात सत्तांतर होताच आयुक्त चहल यांनी सर बोलण्याचे विक्रम तोडण्यास सुरुवात केली आहे. आयुक्तांनी नुकताच पालिका अर्थसंकल्प सादर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव तसेच सर असा उल्लेख २० ते २२ वेळा केला होता. आज चेंबूर टिळक नगर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रास्ताविक करताना केलेल्या कामाची माहिती देताना आयुक्तांनी १३ मिनिट भाषण केले. या १३ मिनिटात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तब्बल ११८ वेळा सर असा उल्लेख केला. इतकेच नव्हे तर कामामध्ये कुठेही मी कमी पडणार नाही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू असेही आयुक्तांनी आश्र्वस्त केले.
पाठीवर शाबासकी: मुंबईत चांगली कामे व्हावीत, यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाला प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही आयुक्तांच्या रुपाने प्रशासनाचा सत्कार केला आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू व त्याचे सहकारी प्रशासन चांगलं काम करीत असल्याचे गौरवोद्गार यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.