मुंबई - कोस्टल रोड प्राधिकरणाकडून मच्छीमारांचे नुकसान होत असून वारंवार तक्रार करूनही प्राधिकरणाने त्याची दखल घेतली नाही. यामुळे अखेर संतापलेल्या मच्छिमार संघटनांनी वरळी कोळीवाडा येथे काम बंद पडत आंदोलन केले. प्राधिकरणाने नांगरल्या बार्जेस कोस्टल रोड प्राधिकरणाने संपूर्ण समुद्र किनार्यावरच बार्जेस नांगरून ठेवल्या आहेत. या बार्जेस नांगरल्याने मच्छीमारांना मासेमारी करता येत नाही. तसेच बार्जेसमुळे जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मच्छीमारांचा तीव्र संताप -
कोस्टल रोड प्राधिकरणाला आणि कोस्टल रोडच्या कामाला सहाय्य करण्याच्या हेतूने मच्छीमारांनी आतापर्यंत सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, प्राधिकरणाने गेल्या काही दिवसांपासून हुकूमशाही पद्धतीचे धोरण अवलंबले आहे, असा आरोप संघटनांनी केला. मच्छीमारांना मासेमारी करण्यापासून वंचित ठेवले जात असल्याने प्रशासनाला अडवण्याची भूमिका मच्छीमारांनी घेतली आहे. जोपर्यंत मच्छिमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोस्टल रोडचे काम बंद ठेवण्याचा इशारा मच्छिमारांनी दिला आहे.
हेही वाचा - यास्मिन वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात केली तक्रार
दोन खांबातील अंतर कमी करण्याची मागणी -
मासेमारीला जाताना समुद्रातील मार्गात दोन खांबांमधील अंतर किमान दोनशे मीटर ठेवावे अशी मच्छीमारांची मागणी आहे. मात्र हे अंतर केवळ ६० मीटर ठेवण्यात येत आहे. प्राधिकरण जाणीवपूर्वक ही बाब करीत असून यापुढे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्राधिकरण स्वीकारणार का? असा सवाल मच्छीमारांनी केला आहे. मच्छिमार संघटनांनी केलेल्या या आंदोलनामुळे वरळी कोळीवाड्यात काही काळ तणावाचं वातावरण होतं. यावेळी पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.