मुंबई - महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. योगायोगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्रात येत आहेत. मात्र, मोदींच्या या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. राज शिष्टाचारानुसार देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती दौऱ्यावर येत असल्यास राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आणि राज्यपाल त्यांचे स्वागत करतात. पंतप्रधानांचा पुणे दौरा अतिशय कमी कालावधीचा आहे. याशिवाय कोरोना प्रादुर्भावाचा काळ असल्याने यात काही मर्यादाही आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री किंवा राज्यपालांनी स्वागतासाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. पंतप्रधान कार्यालयाकडूनच असे कळवण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले.
पंतप्रधान सीरमला देणार भेट -
कोरोनावर लस तयार करण्याचे काम देशातील काही संस्थांमध्ये सुरू आहे. या लस निर्मितीची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे अहमदाबादच्या झायडस कँडीला, हैद्राबादच्या भारत बायोटेक तर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. या भेटीत पंतप्रधान देशात लस तयार करण्याचे काम कसे चालले आहे. याशिवाय लस तयार झाल्यानंतर या लसींच्या एकूण उत्पादनावर संबंधित कंपन्यांच्या संचालकांशी चर्चा करणार आहेत.
पुण्याचे सीरम इन्स्टिट्यूट देत आहे आपले योगदान -
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती वॅक्सिन तयार केले जात आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) आणि आयसीएमआरने लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. या चाचणीसाठी देशातील १ हजार ६०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली होती. सीरम आणि आयसीएमआर या दोन्ही संस्था संयुक्तपणे कोरोनावरील लसीच्या वैद्यकीय चाचण्या देशात घेत आहे. चाचणीचा खर्च सरकारी संस्था असलेली आयसीएमआर करत आहे. तर कोव्हिशिल्ड लसीवरील इतर खर्च हा सीरमकडून केला जात आहे.