मुंबई - माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या विकास वाटचालीत योगदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणाऱ्या नेतृत्वात ज्येष्ठ नेते निलंगेकर यांचा समावेश होता. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी नेहमी आग्रही असणाऱ्या शिवाजीराव पाटील यांनी तितक्याच तडफेने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. निष्ठावंत राजकीय विचारसरणीच्या पाटील यांच्या निधनामुळे दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. कोरोनाची बाधा झाल्यामुळे 16 जुलैला त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच ते कोरोनामुक्तही झाले होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. परंतु, आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास किडनी विकाराच्या आजाराने त्यांचे निधन झाले.