मुंबई - मुख्यमंत्री बाहेर का पडत नाही? या विरोधकांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शुक्रवारी रायगडला रोरो बोटीने रवाना झाले आहेत. आज या भागात त्यांचा दौरा असून ते ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात ते अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये वादळामुळे कोकणपट्ट्यातील झालेल्या सर्व नुकसानीबाबत चर्चा केली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. यावेळी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबत आढावा घेतला होता. यावेळी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करा. त्यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या. निसर्ग चक्रीवादळाने राज्यात ६ व्यक्तींचा मृत्यू झाला असून ६ जनावरे दगावली, तर १६ नागरिक जखमी झाले. रायगड जिल्ह्यात प्राथमिक माहितीनुसार, ५०३३ हेक्टर जमिनीवर नुकसान झाले. मृत व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपये याप्रमाणे सानुग्रह अनुदान लगेच द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत सांगितले होते.

रायगड जिल्ह्यात घरांचे नुकसान झाले आहे, त्यांच्याकडे स्वयंपाक पाण्याची सोय नाही. त्यांना तातडीने अन्न धान्य पोहोचवणे गरजेचे आहे. यंत्रणेने ते काम लगेच हाती घ्यावे. महावितरणने अधिकचे मनुष्यबळ या भागात लावून वीज पुरवठा पहिल्यांदा सुरू करावा. रुग्णालये, क्लिनिक यांना वीज पुरवठा सुरू राहणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई देताना नागरिकांना विश्वासात घ्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. संकट मोठे आहे. आपण सर्व कोरोनामध्ये दिवसरात्र काम करत आहात त्याचे निश्चितच कौतुक आहे. शिवाय, मुंबई परिसरातील छावण्यांमध्ये स्थलांतरित केलेल्या नागरिकांना परत आणताना त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
आपल्या नशिबामुळे या चक्रीवादळाचा जोर ओसरला. आपल्याला आता सदैव दक्षता घ्यावी लागेल. महत्वाचा मुद्दा असा की, पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत. पण, आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला पहिल्यांदाच खूप वर्षांनी असे वादळ आले. त्यामुळे आपल्याला भविष्यातील तयारीही ठेवावी लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.
उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर ऊर्जामंत्र्यांनी रायगड जिल्ह्याची केली पाहणी -
उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत, तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारीच रायगड जिल्ह्याची पाहणी करून विस्कळीत वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत.