मुंबई - अर्थचक्र कोरोनाच्या संकटात फसले आहे. कोरोनामधून मुक्त झाल्यावर आपण आर्थिक संकटात सापडू शकतो. त्यामुळे अर्थकारणावर लक्ष केंद्रीत करणेही तितकेच गरजेचे आहे. काही जिल्ह्यांत कमी रुग्ण आहेत, तर काही ठिकाणी एकही रुग्ण नाही. त्यानुसार ग्रीन आणि ऑरेंज झोन तयार केले आहेत. या दोन झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यासाठी परवानगी देत आहोत. मात्र, त्यासाठी काही अटी-शर्ती आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
फक्त मालवाहतूक केली जाईल. मजुरांची वाहतूक करण्यावर बंदी आहे. कंपनी मालकांना मजुरांची आवश्यक ती काळजी आणि सोय करावी लागणार आहे. या अटी पाळणाऱ्या उद्योजकांना उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यादरम्यान, जिल्हाबंदी उठवली जाणार नाही. या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात फक्त मालवाहतुकीला परवानगी असेल. तसेच शेती आणि कृषीविषयक उद्योगधंद्यामध्ये बंधने नव्हती आणि आता देखील राहणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई-पुणे यासारखे रेड झोन वगळता इतर ठिकाणी वृत्तपत्रांबाबत विचार - मुख्यमंत्री
वृतपत्रांवर बंदी नाही. मात्र, स्टॉल्सवर वृत्तपत्र उपलब्ध होतील. मुंबई-पुण्यासारख्या रेड झोनमध्ये घरोघरी वृत्तपत्र टाकणे, यामध्ये मला धोका वाटतो. त्यामुळे मी असा धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे वृत्तपत्र घरोघरी वाटप करण्यावर बंदी घातली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबई, पुणे यासारखे रेड झोन वगळून इतर ठिकाणी काय निर्णय घेता येईल, याबाबत आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे वृत्तपत्रमालकांनी चिंता करण्याची गरज नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.