मुंबई - एका बाजूला कोरोनाचे संकट सुरू असताना मिशन बिगिन अगेनमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा कट केला जातो आहे. ही गोष्ट अजिबात सहन केली जाणार नाही. अनेक लोकांना वाटतंय मिशन बिगिन अगेनमध्ये पुन्हा एकदा राजकारण केलं जातं आहे. जे राजकारण करत आहेत त्यांना करू द्या. मी सध्या या सगळ्यावर शांत आहे. या सगळ्यावर मी आज बोलणार नाही, मात्र त्यावर एक दिवस मी नक्की भाष्य करणार आहे. राजकारण करत आहेत त्यांना करू द्या. मात्र, महाराष्ट्राची बदनामी कदापि सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. आज त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्याच्या जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
तमाम नागरिकांना मनापासून धन्यवाद व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संवादाची सुरुवात केली. सणासुदीचा, पावसाळ्याचा आणि शेतीचा काळ आहे. आपण गणेशोत्सव, साधेपणाने साजरा केला. जैन, मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी सर्वच धर्मियांनी सामाजिक जाणीव ठेवली व संयम पाळला त्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद दिले. मिशन बिगिनची प्रदीर्घ माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, आपण मिशन बिगिन अगेनमध्ये जीवनाची गाडी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. कार्यालयातील उपस्थिती वाढविली आहे. उद्योग, दुकाने, मॉल, उघडत आहोत. मधल्या काळात जिल्हांतर्गत वाहतूकही सुरू केली आहे. तीन गोष्टी एकत्र येत आहेत. एक तर आयुष्य पूर्वपदावर आणत आहोत. पण सणासुदीचे दिवसही येत आहेत. त्यात पावसाळा आहे यामुळे कोरोनाची भीती दिसते आहे. दुसरी लाट असल्याचे भीतीदायक चित्र जगभर आहे.
मुंबईत दोन हजार रुग्ण दिवसाला सापडत आहेत. ग्रामीण भागातही कोरोना हातपाय पसरत आहे, असा इशारा त्यांनी दिला. या संकटातही राज्य विधानमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशनही पार पडले. यासाठी मी सर्वपक्षीयांना धन्यवाद देतो. एकूणच काय तर सगळे जण सामाजिक भान ठेवून वागताहेत. मात्र, सारे काही खुले करतो आहोत म्हणजे काही जणांनी पुनश्च राजकारण सुरू केले आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काही उत्तर नाही. पण, महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव टाकला जात आहेत, राजकारण केले जात आहे त्यावर मी कधीतरी मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून नक्की बोलेन. पण आज माझ्या दृष्टीने कोरोना महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेची माहिती देत मुख्यमंत्री म्हणाले, मी पूर्वी म्हटले होते की तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. यात आता मी थोडा बदल करून तुम्ही थोडी जबाबदारी घ्या, असे आवाहन करतो आहे. आणि ती तुम्ही घेतलीच पाहिजे. महाराष्ट्रात महिनाभर एक मोहीम माझे कुटुंब, माझी जबाबदारी या नावाने राबविली जाईल. यामध्ये जात, पात, धर्म, पक्ष बाजूला सारून आपण सर्वांनी सहभागी व्हावे. महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली स्वत:ची आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले. कोरोनाचे औषध कधी येणार? असा प्रश्न विचारला जातोय, पण डिसेंबर जानेवारीपर्यंत ते काही होणार नाही, असे दिसते. तोपर्यंत सर्वांनी सदा सर्वदा मास्क लावावा, गर्दी करायची नाही. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दीत अंतर ठेवायचे, हात सतत धूत राहणे. सध्या ही त्रिसूत्री हाच विषाणूपासून लांब राहण्याचा उपाय आहे.
राज्यभर आपण सुविधा वाढवतो आहोत. ऑक्सिजन ही आरोग्य प्राथमिकता. ८० टक्के ऑक्सिजन उत्पादन आपण वैद्यकीय कारणासाठी राखीव ठेवत आहोत. राज्यात आपण डॉक्टर्सचे टास्क फोर्स, कोरोना दक्षता समित्या नेमल्या आहेत, मुख्यमंत्री पुढे म्हणाले. माझे कुटुंब, माझी जबाबदारीमध्ये आपल्याला अवघड वाटेल पण अशक्य नाही पण १२ कोटी जनतेची आरोग्य चौकशी करतो आहोत. आपला प्रयत्न असा आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक घरात दोन वेळा तरी आरोग्य टीम जाईल. प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या वॉर्डची जबाबदारी घ्या. लोकप्रतिनिधींनी मतदारसंघांची जबाबदारी घ्यावी. घरोघर आरोग्य चौकशी केली जाईल. आपल्याकडे ५० ते ५५ वयापेक्षा मोठे कोण आहेत? व्याधी आहेत का, प्रत्येकाची ऑक्सिजन पातळी काय तसेच इतरही आरोग्याच्या बाबी पाहिल्या जातील. एकूणच काय 'चेस दि व्हायरस' मोहिमेचेच हे रूप आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार. प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, वाहिन्या, जाहिरात संस्था यांना देखील यात सहभागी होता येईल. लोकांमध्ये वावरताना सुरक्षित अंतर ठेवावे. २ मीटर्सपर्यंतचे अंतर असावे, मास्क घालावा. हात वारंवार धुवावे, इतर व्यक्तींशी बोलताना थेट त्यांच्या चेहऱ्याकडे बघून बोलणे टाळावे. बाहेरून घरी आल्यावर चेहरा आणि कपडे लगेच धुवावे, ऑनलाईन खरेदीवर भर द्यावा. दुकानातील वस्तूंच्या सॅम्पलना हात लावू नये, सार्वजनिक वाहनांत असाल तर बोलू नका. बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्स यंत्रणा वापरा, जर लक्षणे आढळली तर तुम्ही कुठे गेला होतात आणि कुणाला भेटला होतात ते माहीत करून घ्या, इतरांसमवेत जेवताना समोरासमोर बसू नका, थोडे आजूबाजूला बसा, बंद जागी भेटणे, गर्दी करणे टाळा. अडचणीच्या व अपुऱ्या जागी जास्त वेळ थांबू नका. मी राज्याच्या कानाकोपऱ्यात जिथे तुम्ही गेला नाहीत तिथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मदतीने गेलो आहे आणि सातत्याने माझा सर्वांशी संपर्क आहे.
कोरोना विरूद्धचे हे युद्ध आहे. जनता रस्त्यावर उतरते तेव्हाच यश मिळेल. पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईत शिथिलता येत आहे. लोक मास्क घालत नाहीत. इतर देशांनी कायदे कडक केले आहेत. कायद्याने सर्व काही करण्याची गरज आहे का? स्वत:हून आपल्या व इतरांच्या आरोग्यासाठी आपण वागू शकत नाही का? काही ठिकाणी मात्र कायदे करावे लागणार, अंगवळणी पडेपर्यंत समजावून घ्यावे लागेल. शिथिलता कामाची नाही.
सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, याही कठीण परिस्थितीत २९.५ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. विक्रमी कापूस खरेदी केली. मोफत दूध भुकटी आपण कुपोषित बालके आणि आदिवासी महिलांना देत आहोत. खावटी अनुदान योजना सुरू केली आहे. शिवभोजन थाळी ५ रुपये केली आणि आजपर्यंत पावणे दोन कोटी थाळ्या आपण वितरीत केल्या. राज्यभर बेड्स वाढवतो आहोत. मार्च २०२० मध्ये ७७२२ बेडस होते. आज एकूण उपलब्ध बेडची संख्या ३.५८ लाख एवढी आहे. आरोग्य सुविधा वाढवत आहोत. औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवला आहे. काही ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात केली आहे, अडचणींवर मात करीत आहोत.
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना 700 कोटींची मदत दिली. त्याठिकाणी केंद्रीय पथकाने देखील समाधान व्यक्त केले आहे. पूर्व विदर्भात १८ कोटी रुपये तातडीची मदत दिली आहे. याठिकाणी सुद्धा कोल्हापूर, सांगलीप्रमाणे संपूर्णपणे मदत करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निसर्गाच्या लहरीवर शेती पिकते. त्यामुळे शेतकर्याचे नुकसान होते. त्यामुळे जे विकेल ते पिकेल अशी मोहीम सुरु करीत आहोत.असंघटीत शेतकऱ्यांच्या सोबत सरकार असणार आहे आता शेतकऱ्यांना हमखास भाव देणार, असं मुख्यमंत्री म्हणालेमराठाआरक्षणावर सविस्तर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले,नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची मागणी मान्य केली आणि हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे दिले त्यासाठी धन्यवाद. मात्र असे करतांना त्यांनी आरक्षण लागू करण्यास अंतरिम स्थगिती दिली. मराठा समाजाच्या भावना याच राज्य सरकारच्या भावना आहेत हे मी स्पष्ट करू इच्छितो. मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. कालच मी विरोधी पक्ष नेत्यांशी देखील बोललो आहे, ते बिहारच्या दौऱ्यावर आहेत, ते आल्यावर त्यांच्याशीही प्रत्यक्ष चर्चा होणार आहे. पण या विषयावर कोणतेही राजकारण न करता आम्ही सरकारच्या बरोबर आहोत असे ते देखील म्हणाले आहेत. सरकार याप्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते. तुमच्या मागणी साठी आक्रमकपणे, चिवटपणे कायदेशीर लढाई लढली जाईल मग हे रस्त्यावर आंदोलन, मोर्चे कशासाठी आहेत ? एकतर कोरोनाचे संकट आहे त्यात आंदोलन, मोर्चे काढू नका, तुम्हाला न्याय मिळवून देण्यास वचनबद्ध आहे,. कुणीही गैरसमज पसरवू नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.कोरोनाच्या संकटात जबाबदारीचा हिस्सा आपण उचला. जरी औषधे नसली तरी दररोज हजारो लोक बरे होऊन घरी जात आहेत. सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोना विरुद्धचा लढा आपण जिंकुत, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संवादाचा शेवट केला.