मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (दि. 8 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही भेट होणार आहे. न्यायमूर्ती भोसले समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर झाल्यानंतर राज्य सरकार कायदेशीर बाबीच्या तयारीला लागले आहे. मात्र, 102 व्या घटना दुरुस्तीनंतर 50 टक्क्यांवर आरक्षण राज्य सरकारला देण्याचे अधिकार राहिले नाहीत, असे यापूर्वीच मुख्यमंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमिती यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आरक्षणबाबत अधिकार आता राष्ट्रपती आणि पंतप्रधांकडे गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये लक्ष घालून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावे, अशी विनंती यादीत मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता खुद्द मुख्यमंत्री या मुद्द्यावर पंतप्रधानांची उद्या भेट घेणार आहेत.
राष्ट्रपतींना लिहिले होते पत्र
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षणाचा उपसमितीच्या सदस्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रपतीने लक्ष घालावे. अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी राज्यपालांना दिले होते. त्यांना विनंती केली होती की त्यांनी ते पत्र राष्ट्रपतींना द्यावे.
हेही वाचा - सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ ;एकनाथ खडसेंची टीका