मुंबई - कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच तिसऱ्या लाटेशी शक्यता वर्तवली जात आहे. असे असताना भाजप आणि मनसेकडून मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद केला जातो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरून विरोधकांना झापले. तुम्ही आंदोलन करा, पण ते कोरोना विरोधात असायला हवे. मात्र, राजकारण करताना जनतेच्या जीवाशी खेळू नका, असा सूचक इशारा दिला. तसेच लोकां सांगे ब्रह्मज्ञान, असा प्रकार स्वतः ही खपवून घेणार नसल्याचे ते म्हणाले.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या "माझा डॉक्टर" या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य सर्वश्री, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, अमेरिकेतील डॉ. मेहूल मेहता, यांच्यासह राज्यभरातील डॉक्टर्स, नागरिक आणि या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तिसरी लाट अपरिहार्य असेल, ती येऊ नये अशी आपली प्रार्थना -
आज कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात मग आज ही चर्चा कशासाठी, तर कारण स्पष्ट आहे. जगभरातील देशात तिसऱ्या लाटेचा अनुभव कटु आहे. आकडे ही स्थिती स्पष्ट करतात. अमेरिकेचे डॉ. मेहूल मेहता त्यांच्या देशातील स्थितीबाबत बोलणार आहेत. तिसरी लाट अपरिहार्य असेल, ती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या पुढे एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे अस मला वाटत. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ते हे प्रयत्न आहेत. मुळात तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धचे जर हे युद्ध आहे असं आपण मानतो तर आपली सगळी शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे. डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी सगळेच कोरोना योद्धे आहेत, त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री, औषध उपलब्धता या सगळ्या गोष्टीही महत्वाच्या असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
अजून राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली जात आहे. मग त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे त्यासाठी आपणही सज्ज राहिले पाहिजे. लाट ऊंचीवर पोहोचली की श्वास घ्यायला उसंत मिळत नाही. यावेळी आपल्या यंत्रसामग्रीचा वापर वाढतो. ऑक्सिजन असो की रुग्णशय्या, व्हेंटिलेटर्स असो की अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सगळ्या रुग्णालयांनी या गोष्टीचे ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
हेही वाचा - शेतकऱ्यांचा सत्याग्रह, आंदोलनाची व्याप्ती पाहून सरकार हादरले - राजू शेट्टी
घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी -
शिक्षक कुठे, कधी कसा भेटेल हे सांगता येत नाही. कोरोनाने आपल्याला काय शिकवलं हे मागे वळून पाहण्याची गरज आहे. रस्ता क्रॉस करतांना आपण मागे-पुढे वळून पहातो, रहदारीची काळजी घेतो. तसेच आता आपल्याला कोरोनाचे संकट क्रॉस करून पुढे जायच आहे. आरोग्य सचिवांनी आपल्याला हा रस्ता कसा क्रॉस करायचा याचेच सादरीकरण केले. आपल्याला सावधपणे पुढे कसे जाता येईल हे सांगितले. ही सगळी काळजी घेतांना अनेकांना सगळ्या गोष्टी उघडण्याची घाई आहे. अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी आम्ही राजकारण्यांनीही, राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका. आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा, असे मुख्यमंत्री ठाकरे यानी सांगताना आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद होऊ नयेत याची काळजी घेण्याचीही गरज आहे. ती घेतली नाही तर आपण कोरोनाच्या संकटातून कधीच बाहेरच पडणार नाही. यामुळे कोरोना सदैव आपल्यासोबत राहण्याची शक्यता वाढू शकते. तसे होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले.
१.२५ लाख ऑक्सिजन बेडची उपलब्धता -
महाराष्ट्राने ज्या वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली तेवढी क्वचितच एखाद्या देशाने केली असावी. पण आजही ऑक्सिजनची आपल्याकडे कमी आहे आपण रोज ३ हजार मे. टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. काही यंत्रसामग्री बाहेरून आणावी लागत आहे, त्यात काही वेळ जाणार आहे. आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ केली आहे. आज आपल्याकडे १.२५ लाख ऑक्सिजन बेडची उपलब्धता आहे. भविष्यात ही यंत्रणा वाढवडणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. इतर राज्यातील ऑक्सिजनच्या स्थितीवर त्यांनी लक्ष वेधले.
पावसाळा सुरू आहे. डेंग्यु, मलेरिया चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याकडेही लक्ष देण्याची गरज, असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना नसला तरी डेंग्यु, मलेरियाच्या रुग्णांची काळजी घेण्याची गरज आहे. डेंग्युची लक्षणेही बदलेली दिसतात. लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणी, चारचौघात वावरतांना काळजी घ्या, मास्क नक्की लावा. माझा डॉक्टरांनीही आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना यासंबंधी सांगून जनजागृती करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
हेही वाचा - ईडीचा वापर करून केंद्र सरकारकडून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न - शरद पवार
कोरोनामुक्त गावाची संकल्पना शासनाने राबविली. मला खुप अभिमान आहे की महाराष्ट्रातील अनेक गावांनी यात सहभागी होऊन आपल्या गावाला कोरोनामुक्त केले. माझे-कुटूंब माझी जबाबदारी ही जशी महत्त्वाची गोष्ट आहे तशीच माझे गाव माझी जबाबदारी हे सुद्धा महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन गाव कोरोनामुक्त करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आता सणवाराचे दिवस सुरू आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विषाणुचा रोज नवा अवतार येत आहे आणि जगाला ग्रासून टाकत आहे. वाहतूकीतून कोरोनाचा प्रवास होत आहे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.