मुंबई - महात्मा गांधी एक विचार आहे. ‘खेड्याकडे चला’ या त्यांनी दिलेल्या संदेशाचे आपण आज आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यांची ग्रामराज्य तसेच स्वातंत्र्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी आजही गांधीजींचे विचार मार्गदर्शक ठरतात. खेड्यातील माणसाला त्याचे जीवन आनंदाने जगता यावे यासाठी खेड्यांना विकासाच्या मार्गावर नेऊन ती सक्षम आणि स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य आणि विकास खेड्यापर्यंत नेणे म्हणजे सर्वांनी खेड्याकडे जाणे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले. महात्मा गांधीजींच्या 151 व्या जयंती वर्ष सप्ताहनिमित्ताने सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, काळाला आपल्या कामातून दखल घ्यायला लावणारी थोर व्यक्तिमत्त्वेच महात्मा होतात. सेवाग्राम येथून स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली. तेव्हा तंत्रज्ञानही नव्हते, पारतंत्र असल्यामुळे सर्व बाजुंनी बंधने होती. प्रसाराची कोणतीही साधने नसतानाही स्वातंत्र्य संग्रामाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले. एखाद्या ठिकाणी गांधीजी जाणार असे कळल्यानंतर नागरिकांची तिथे प्रचंड गर्दी व्हायची, हे आजोबांनी सांगितल्याची आठवण त्यांनी यावेळी विशद केली. गांधीजींना ऐकायला, पाहायला जनसागर उसळायचा, हे भाग्य मागून मिळत नाही तर कमवावे लागते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
स्वातंत्र्य चळवळीचे रणशिंग फुंकले तसेच चळवळीची बीजे रुजली तो सेवाग्राम आश्रम जगभरातील गांधी अनुयायी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण व्हावे, यादृष्टीने आश्रमाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शस्त्राशिवाय युद्ध जिंकू शकतो, हे सांगणाऱ्या महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाचा जागतिक प्रेरणा केंद्र म्हणून लौकीक निर्माण करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या आश्रमाला लवकरच भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गांधीजींच्या स्मृती जपणाऱ्या सेवाग्राममधील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन ते म्हणाले, सेवाभावी कार्यकर्त्यांनी वास्तूसोबतच गांधीजींची मूल्येही जपली. मूल्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेवाग्रामच्या कार्यकर्त्यांनी मूल्य जपवणुकीचे केलेले काम आपल्याला करायचे आहे. तत्वहीन राजकारण, चारित्र्याशिवाय शिक्षण, कष्टाशिवाय पैसा, नीतीशुन्य व्यवहार, त्यागाशिवाय उपासना, मानवतेशिवाय शास्त्र, विवेकरहित आनंद या महात्मा गांधींनी सांगितलेल्या सात सामाजिक पापांची संकल्पनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विशद केली. त्याचे अर्थ समजून सांगतांना त्यातील विचारांचे महत्त्व सेवाग्राम आश्रमापुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरजही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
सेवाग्राम येथील विकासकामांचे लोकार्पण केले आहे. त्यामुळे त्याची जपणूक करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. स्मारकाच्या जपणूकीसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. चरखागृहात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची नितांत सुंदर स्कल्पचर उभे करणाऱ्या जे. जे. स्कुलचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.
सेवाग्रामच्या भूमीचे पावित्र्य राखण्याचे काम आपलेच – उपमुख्यमंत्री अजित पवार
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सेवाग्रामच्या भूमीचे पावित्र्य राखण्याचे काम आपलेच आहे. सेवाग्राम आश्रम, पवनार आश्रम आणि धाम नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम करताना त्याचे पावित्र्य जपले जावे, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. विकासाची कामे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी देशी झाडे लावण्याचे आवाहन त्यांनी केले. महात्मा गांधी यांच्या ‘खेड्याकडे चला’ हा विचार घेऊन स्वयंपूर्ण गावे, जलस्त्रोत आणि गावांच्या स्वच्छतेवर भर देऊन देशाची वाटचाल शाश्वत विकासाकडे झाली तर तेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असा आशावाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.