मुंबई - परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याच्या परमबीर सिंहांच्या आरोपानंतर विरोधक आक्रमक झाले. तर या लेटरबॉम्बमुळे ठाकरे सरकारची प्रतिमा मलीन झाली. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे म्हटले होते. त्यातच आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देशमुखांवर झालेल्या आरोपाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली द्यायला सांगितली असल्याचा लेटरबॉम्ब मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी टाकला होता. त्यानंतर आक्रमक झालेल्या विरोधकांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यभरात रान उठवले. मात्र या घडामोडीत अनिल देशमुखांनी स्वत: या पत्रांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमत्र्यांकडे केली होती. तर जयंत पाटील यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या प्रकरणात आता मुख्यमंत्री ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे पोलीस दलातील अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या या आरोपांमुळे ठाकरे सरकारवर शिंतोडे उडत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी ४ वाजता वर्षा बंगल्यावर गृह विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत परमबीर सिंह यांच्या पत्रातील आरोपाच्या सत्यतेबाबत पडताळणी होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावले आहे. पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, कायदा व सुव्यवस्था खात्याचे विश्वास नागरे- पाटील, एटीएसचे प्रमुख शिवदीप लांडे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी गृहखात्याचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार का, याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.