मुंबई : काळबादेवी येथील श्री मुंबादेवीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. दरम्यान, श्री काशी विश्वनाथ, तिरुपती बालाजी या मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबादेवी मंदिर डेव्हलपमेंट ऑथिरीटी प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
तिरूपती देवस्थानांच्या धर्तीवर विकास : तिरूपती देवस्थानांच्या धर्तीवर विकास श्री काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैन स्थित महाकाल मंदिर कॉरिडॉर, तिरूपती देवस्थानांच्या धर्तीवर विकास करावा, अशी मुंबईकरांची मागणी आहे. मुंबादेवीचा पुनर्विकास झाला पाहिजे. त्यामुळे आज मंदिराची पाहणी केली. सगळ्यांच्या संमतीने मंदिर परिसराचा विकास करणार आहे. मुंबई महापालिका नाही तर एक ऑथरिटी द्यावी लागणार आहे. त्यानुसार परिसरातील अत्यावश्यक सोयी सुविधा लक्षात घेण्यात येतील. तसेच या ठिकाणी दर्शन रांगा, पार्किंग व येथे आवश्यक असणाऱ्या परिसराच्या विकासाबाबत शासन सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
मुंबईकरांचे कुलदैवत : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री डॉ.दीपक सावंत, माजी मंत्री राज के पुरोहित व माजी नगरसेवक आकाश पुरोहित, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासू आदी उपस्थित होते. मुंबईकरांचे हे कुलदैवत असून प्राचीन मंदिर आहे. मंदिराप्रती सर्वांनाच श्रध्दा, आस्था आणि प्रेम आहे. अनेक भक्तगण मंदिराला भेटी देतात.
मंदिरांचाही पुनर्विकासात समावेश : श्री काशी विश्वनाथ आणि उज्जैनच्या महाकाळ कॉरिडोरच्या धर्तीवर मुंबईच्या मुंबादेवी मंदिराचा पुनर्विकास कारावा. आयएएस अधिकाऱ्याची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करावी. विकास कामात अडथळा येणार नाही, यासाठी मुंबई मनपा, राज्य शासन आणि विविध प्राधिकरणांशी समन्वय साधण्यासाठी अधिकारी नेमावा. शाळा, पार्किंग ठिकाणी भूमिगत 4 मजली पार्किंग उभारावे. आजुबाजूच्या मंदिरांचाही पुनर्विकासात समावेश करावा. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सोयी - सुविधा आणि भाविकांकरिता दर्शन घेण्यासाठी प्रशस्त व्यवस्था उभारावी, अशी मागणी स्थानिक माजी आमदार राज पुरोहित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 9 एप्रिलला सर्व आमदारांना घेऊन आयोध्येला जाणार आहेत. बंडकाळात शिंदे यांनी गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते, नंतर ते अयोध्येला जाणार अशी चर्चा होती. आता त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ते शरयू नदीच्या तीरावर पूजा व आरती करणार आहेत. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यासाठी एक दिवस अगोदर नेत्यांना मुंबईत हजर राहण्याचे निर्देश दिल्याचे समजले आहे.