मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकंदरीत राजकीय घडामोडी वाढल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली फेऱ्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मंत्रिमंडळ विस्तार आणि 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
राजकीय पक्षांकडून निवडणूकांची तयारी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांची सागर बंगल्यावर शनिवारी महत्त्वाची बैठक पार पडली. राज्याच्या राजकारणातील घडामोडी, आरोप प्रत्यारोप, खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होणारे वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वातावरण तंग झाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आपल्या गटातील सर्व आमदार, खासदारांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. दुसरीकडे भाजपकडून लवकरच महापालिका निवडणुका जाहीर होतील, असे सांगण्यात येत आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. तब्बल दोन तास यावेळी खलबतं झाली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन रणनीती ठरवल्याचे समजते.
दिल्ली स्तरावर हालचाली सुरू : शनिवारी रात्री उशिरा भाजप नेत्यांची बैठक संपल्यानंतर, मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेनुसार विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत दिल्ली स्तरावर हालचाली सुरू आहे. त्यामुळे निवडणुका कधीही लागू शकतात, अशी चर्चा आता रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आहे. नार्वेकर यांनी आयोगाकडून शिवसेनेची घटना मागवली आहे. या घटनेचा अभ्यास करून सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाणार आहे. यावर सल्ला मसलत करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा :
- Maharashtra Politics: आगामी महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस लागले कामाला; मुंबईत बैठकांचे सत्र
- Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिंदे गटाचे वाढले टेन्शन; भाजप - शिंदे गट युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता
- Nana Patole on cluster development: क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अदानी- लोढासाठी... काँग्रेस न्यायालयात जाणार-नाना पटोले