मुंबई CM Shinde On Ravindra Waikar : आज (9 जानेवारी) शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळी 8.30 वाजता ईडीनं धाड टाकली. ईडीचं 10 ते 12 अधिकाऱ्यांचं पथक सध्या रवींद्र वायकरांच्या घरी तपास करत आहे. उद्या आमदार अपात्र निकालापूर्वीच ही कारवाई करण्यात आल्यामुळं ठाकरे गटावर दबाव टाकण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, या ईडीच्या कारवाईवर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत असताना, आता यावर स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलीय. "तसंच ज्याला कर नाही त्याला डर कशाला? आमचं सरकार आकसापोटी कोणावरही कारवाई करत नाही,'' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
...म्हणून यांची पोटदुखी वाढलीय : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "सरकार कोणावरही सूड भावनेनं किंवा राजकीय आकस ठेवून कारवाई करत नाही. विरोधक काहीही आरोप करत आहेत. कोरोना काळात किती भ्रष्टाचार झाले तुम्हाला माहिती आहे. आम्ही मग त्यांना 'खिचडीचोर' म्हणायचं का? चूक नसेल तर कोणाला घाबरण्याचं काय कारण आहे? आमचं सरकार लोकहिताचं काम करतं. या राज्याला पुढं नेण्याचं काम आम्ही करत आहोत. तुम्ही बंद पाडलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देत आहोत. आम्ही विकासकामं करतोय म्हणून यांची पोटदुखी वाढलीय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळंच ते खोटे आरोप करतात. पण आम्ही यांना कामानं उत्तर देऊ.''
मेरिटप्रमाणे निकाल लागेल : निकालापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी आपली भेट घेतली, त्यामुळं निकाल तुमच्या बाजूने लागणार, अशी चर्चा आहे असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता ते म्हणाले की, "यामध्ये अजिबात तथ्य नाही. विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही. त्यामुळं ते आरोप करत आहेत. घटनेप्रमाणे अध्यक्ष निर्णय देतील. पण मी आपल्याला एवढंच सांगतो की, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत पहिल्या दिवसापासून आमच्याकडे आहे."
नियमाप्रमाणे सरकार स्थापन : निवडणूक आयोगानं देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून अधिकृत 'धनुष्यबाण' चिन्ह आमच्या पक्षाला दिलंय. त्यामुळं मला वाटतं मेरिटप्रमाणे निकाल लागेल. आम्ही कुठल्याही प्रकारे नियमबाह्य पद्धतीनं काम केलेलं नाही. नियमाप्रमाणं सरकार स्थापन केलंय. त्यामुळं निकाल घटनेला धरुन लागेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -