मुंबई Cm Eknath Shinde On Air Pollution : मागील काही दिवसांपासून मुंबईत हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. यामुळं मुंबईकरांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय. स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या धर्तीवर आज (21 नोव्हेंबर) स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विविध भागातील म्हणजे कलानगर, सांताक्रूझ, जुहू, लिंकिंग रोड, बीकेसी आदी भागात पहाटे सहा वाजल्यापासून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, तसंच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. या पाहणीनंतर मुख्यमंत्री यांनी माध्यमाशी संवाद साधत, प्रदूषण आणि स्वच्छता यावर कशा प्रकारे उपयोजना करता येतील, याबाबत पालिका कर्मचाऱ्यांना आदेश दिले.
दुबईतील कंपनीशी करण्यात येणार करार : मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुबईतील कंपनीशी करार करण्यात येणार आहे. तसंच सार्वजनिक शौचालयातून मोठ्या प्रमाणात घाण आणि दुर्गंधी बाहेर पडते. यावर आळा घालण्यासाठी दिवसातून 4 ते 5 वेळा सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
1000 टँकर भाडेतत्त्वावर मागवा : पाहणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा पाहणीसाठी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी परिसरातील ज्या समस्या आहेत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, "सध्या मुंबईत विविध कामं सुरू आहेत, जसं की पूल, इमारतीची कामं, रस्ते या कामामुळं प्रदूषण निर्माण होत आहे. पण हे काम करत असताना पर्यावरणाचाही समतोल राखता आला पाहिजे. प्रदूषण कसं होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे", असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त चहल यांना, 1000 टँकर भाडेतत्त्वावर मागवा आणि रोज रस्ते धुवून काढा. संपूर्ण टीम एकाच ठिकाणी कामाला लावा आणि इमारतीची काम सुरू आहेत, त्या ठिकाणी इमारती वरती कव्हरिंग करा, जेणेकरुन त्यातील धूळ बाहेर येणार नाही, अशी खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.
सार्वजनिक शौचालय दिवसातून चार-पाच वेळा स्वच्छ करा : पुढं बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "मुंबईत सध्या पुलाची कामं सुरू आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात धूळ बाहेर पडत आहे. त्यातूनही प्रदूषण होतंय. परंतु या पुलामुळं भविष्यात मुंबईकरांना मोठा फायदा होईल. मुंबईतील सागरी किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी राबवावी. जे कर्मचारी अन्य भागात काम करतात, त्यांना एकाच ठिकाणी बोलवून, एक एक भाग मार्गी लावावा. तसंच मुंबईतील स्वच्छतेबाबत दुबईतील कंपनीकडून चर्चा करुन सल्ला घेणार. त्यासाठी दुबईतील कंपनीशी करार करण्यात येईल" असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
15 डिसेंबरपासून कृत्रिम पावसाची प्रक्रिया सुरू : क्लाऊड सीडिंगच्या माध्यमातून प्रदूषणाला तोंड देण्याची योजना महापालिकेनं आखली आहे. 15 डिसेंबरपासून कृत्रिम पावसाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हा उपक्रम काही काळापूर्वी दिल्लीत घेण्यात आला होता. यापूर्वी महाराष्ट्रात आणि मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्यात आलाय. अशा स्थितीत मुंबई महापालिकेला कृत्रिम पावसाचा अनुभव आहे. पण मुंबईत कृत्रिम पाऊस कधी होणार आणि त्यासाठी किती खर्च येईल, याची माहिती पालिकेच्या प्रशासनानं दिली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी मुंबई महापालिका 15 डिसेंबरपासून मुंबई आणि परिसरात कृत्रिम पाऊस पाडणार आहे. यासंदर्भातील निविदा पुढील आठवड्यात काढण्यात येणार असल्याचं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सांगितलं. येत्या 15 ते 20 दिवसात क्लाऊड सीडिंगची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. 15 डिसेंबरनंतर मुंबईत कृत्रिम पावसाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
प्रयोगासाठी एकावेळी 40 ते 50 लाख रुपये खर्च : कृत्रिम पाऊस पडण्यास निश्चितच थोडा वेळ लागणार असला, तरी डिसेंबरमध्ये अधिक प्रदूषण असलेल्या भागात कृत्रिम पाऊस पाडला जाईल, अशी अपेक्षा आहे. यामुळं मुंबईतील प्रदूषण कमी होण्यास आणि शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. सुधाकर शिंदे म्हणाले की, "दुबईमध्ये अनेकदा कृत्रिम पावसाचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी आणि कमी वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. आवश्यक वातावरण, वेळ, ठिकाण, हवामान आणि ढग यांचं निरीक्षण करुनच कृत्रिम पावसाची प्रक्रिया पुढं नेली जाईल" असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, मुंबईत क्लाऊड सीडिंगचा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील पंधरा दिवस प्रदूषणाच्या समस्येपासून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. या प्रयोगासाठी एकावेळी 40 ते 50 लाख रुपये खर्च येतो. शिंदे पुढं म्हणाले की, "दुबईमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग सातत्यानं केले जातात. अशा परिस्थितीत तिथला खर्च इथल्या तुलनेत कमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा प्रशासकीय विभाग दुबईतील तज्ज्ञांशी सतत संपर्क ठेवत आहे" असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा -