मुंबई: आज आज सायंकाळी मुंबई हवामान विभागाने चेतावणी जारी केली आहे. या चेतावणी नुसार पुढील 3-4 तासांत ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहून पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज अधिक तापमानाची नोंद: मुंबईत आज कमाल तापमान ३९.३ अंशांवर पोहोचले होते. कमाल तापमानाची ही स्थिती सोमवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मुंबईत आज दिवसभर कडक ऊन आणि कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले असले तरी रात्री वातावरणात काही प्रमाणात गारवा जाणवत असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी सांताक्रूझमध्ये कमाल तापमान ३९.३ अंश सेल्सिअस होते, तर कुलाबा येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सांताक्रूझमधील तापमान शनिवारच्या तुलनेत २.३ अंशांनी अधिक होते. सायंकाळी सांताक्रूझमध्ये ३३ टक्के तर कुलाबा येथे ५४ टक्के आर्द्रतेची नोंद झाली. कमी आर्द्रतेमुळे उष्णतेच्या लाटा अधिक जाणवत असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
मार्चमध्ये तापमान वाढणार: मुंबई शहरातील विविध केंद्रांवर तापमान ३६ ते ३९.३ अंशांच्या दरम्यान होते. उत्तर मुंबईत काही केंद्रांवर पारा ३९.३ ते ३८.४ पर्यंत नोंदवला गेला. मध्य मुंबईतील तापमान ३४ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. यापूर्वी, मुंबईत मार्चमध्ये 2021 मध्ये 40.9 डिग्री सेल्सियस, 2019 मध्ये 40.3, 2018 मध्ये 41, 2015 मध्ये 40.9 आणि 2013 मध्ये 40.5 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. हे तापमान त्या वर्षी मार्चमध्ये मुंबईतील सर्वाधिक कमाल तापमान नोंदवले गेले होते. मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात तापमान 40 अंशांच्या वर पोहोचलेले होते. मात्र यावेळी मार्च महिन्यात तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली गेली आहे.
हेही वाचा: IIT Student Suicide Case : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण; चौकशी समितीने केला 'हा' मोठा खुलासा