मुंबई - मुंबईत मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्यासाठी क्लिनअप मार्शल नेमण्यात आले आहे. मात्र हे क्लिनअप मार्शल नागरिकांना मारहाण करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यावर उपाय म्हणून क्लिनअप मार्शलला नागरिकांशी कसे वागायचे, कसे बोलायचे याचे प्रशिक्षण दिले जाईल, असा खुलासा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
क्लिनअप मार्शलला प्रशिक्षण
मुंबईत जुहू येथे मास्क न लावणाऱ्या नागरिकांना क्लिनअप मार्शलकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी खुलासा केला आहे. मारहाणीचे प्रकार समोर येत असल्याने मारहाण करणारे क्लिनअप मार्शल खरे आहेत का ते पाहिले जाईल. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. सध्या अनेक संस्थांचे क्लिनअप मार्शल मुंबईत आहेत. आता क्लिनअप मार्शलला ओळखपत्र दिले जाईल. तसेच त्यांना नागरिकांशी कसे वागावे कसे बोलावे याचे दोन तासांचे प्रशिक्षण दिले जाईल अशी माहिती महापौरांनी दिली.
आता रेल्वेतही मार्शल
मुंबईत 1 फेब्रुवारीपासून लोकल ट्रेनमधून सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तेव्हापासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. पालिकेचे क्लिनअप मार्शल रेल्वे स्टेशनच्या आत प्रवाशांवर कारवाई करत आहेत. मात्र आता रेल्वेच्या आतही विनामास्क प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी मार्शलची नियुक्ती केली जाणार आहे. 300 ते 1000च्या आसपास मार्शल असतील. रेल्वेतून आमचे मार्शल फिरतील आणि लक्ष ठेवतील. मार्शलला आपण तिकीट देतोय असेही महापौर म्हणाल्या.
हेही वाचा - थरारक! श्रीनगरमध्ये संशयित दहशतवाद्याचा बेछूट गोळीबार, 2 पोलिसांचा मृत्यू