मुंबई - लोकसभेत आणि राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले असले तरी देशातील काही भागात या विधेयकाला मोठा विरोध करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून गुरुवारी सायंकाळी चेंबूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर संविधान संवर्धन समितीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केले.
नागरिकता दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेतही मंजूर झाल्याने सरकारकडून मोठा विजय झाल्याचे दर्शविले जात आहे. मात्र, या विधेयकाला देशातील वेगवेगळ्या राज्यातून मोठा विरोध होत आहे. हे विधेयक देशातील नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यांचे आणि धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या विरुद्ध आहे. यामुळे सामाजिक एकतेचा मोठा धोका निर्माण झाल्याचे संविधान समिती संवर्धनचे अध्यक्ष सुरेश सावंत यावेळी म्हणाले.
हेही वाचा - 'नागरिकत्व सुधारणा विधेयक असंवैधानिक; केरळमध्ये लागू करणार नाही'
विधेयकामध्ये देशाच्या शेजारच्या राज्यातून आलेल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, यात मुस्लीम धर्माला वगळण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. असाच प्रयोग आसाम राज्यांमध्ये करण्यात आला. मात्र, तेथे वेगळेच चित्र निर्माण झाले. त्याठिकाणी मुस्लीम समाजाच्या लोकांना बाहेर काढायचे होते. मात्र, त्यात हिंदूंची बहुसंख्य नोंद झाली नव्हती. त्यामुळे तो प्रयोग आसाम राज्यात फसला, असे नीला लिमये या आंदोलनकर्त्या म्हणाल्या.
दरम्यान, या विधेयकाच्या निषेधात महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील उच्च पदावरील पोलीस अधिकारी अब्दुर रहमान यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.