मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकणासह सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पश्चिम धरण क्षेत्रामध्ये पडणार्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करावा लागतोय. कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पुन्हा एकदा सांगली, कोल्हापूरमधील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावात गावातील नागरिकांनी लवकरात लवकर सुरक्षितस्थळी जाण्याची विनंती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच एनडीआरएफ टीमसह स्थानिक प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी आहेच, मात्र मदत पोहोचण्याची वाट पाहण्यापेक्षा नागरिकांनी स्वतः सुरक्षितस्थळी जावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले आहे.
कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्कात -
पश्चिम महाराष्ट्रातील २०१९ चा पूर आठवला की अनेकांना झोप लागत नाही. मागच्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे आणि पूरस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. शिवाय प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सातत्याने संपर्कात आम्ही आहोत, असे म्हणून जनतेला जयंत पाटील यांनी धीर दिला आहे.
कृष्णा खोऱ्यातील पूरस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता -
कोयना धरण परिसरात गेल्या चोवीस तासात 604 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात 18 टीएमसी पाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहा हजार क्यूसेक पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग धरणातून करावा लागणार असल्याचे जयंत पाटील यांनी ही शक्यता वर्तवली आहे.
जलसंपदा मंत्री यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन -
नदीकाठच्या गावातील सरपंच नगरसेवक, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आपल्या परिसरातील लोकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा -पाटणमधील नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर; यशवंतराव चव्हाणांची समाधी पाण्याखाली!