मुंबई - कोरोना प्रादुर्भाव संपवायचा असेल तर जास्तीत जास्त लसीकरण हाच मार्ग असल्याचे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे, मात्र राज्यात निर्माण झालेला लसीकरणाचा तुटवडा, त्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी दिलेली परवानगी, यामुळे मुंबईमध्ये अनेक लसीकरण केंद्रांवर प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. फक्त ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे आज मुलुंडच्या बीपीएम शाळेसमोरील लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गोंधळ घातला.
केंद्राबाहेर पोलिसांना पाचारण
लसीकरणासाठी वरिष्ठ नागरिकांनी या केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, परंतु सकाळी नाव नोंदवून देखील दोन ते तीन तास रांगेत उभे राहिल्यानंतर लस मिळणार नाही, अशी सूचना जेव्हा लसीकरण केंद्रातून करण्यात आली, त्यावेळी नागरिकांचा संताप अनावर झाला. अखेर लसीकरण केंद्राबाहेर पोलिसांना पाचारण करावे लागले.
हेही वाचा - पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे मुंबईकर मोफत लसीपासून वंचित; भाजप खासदाराचा आरोप
लसीकरणासाठी रांग लावताना कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. यात अनेक जण हे जेष्ठ नागरिक असतात, त्यांना जास्तीत जास्त वेळ उभे रहावे लागते यामुळे भर उन्हात त्यांना चक्कर येण्याची देखील शक्यता आहे. काही नागरिक तर सकाळी पाच वाजल्यापासून आपला नंबर यावा यासाठी रांग लावतात, अशा विविध प्रश्नांवरती पालिका प्रशासनाने लक्ष देऊन त्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा - मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; 40 किलो गांजा जप्त