मुंबई: शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांनंतर विद्यार्थ्यांपुढे करिअर निवडीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात; मात्र नेमक्या कोणत्या पर्यायाची निवड करावी, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती नसते. यामुळे विद्यार्थी संभ्रमित होतात. मात्र, परंपरागत अभ्यासक्रमांच्या मागे न लागता विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. त्यासाठी राज्य सरकार विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करेल, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
'हे' अभ्यासक्रम निवडा: बारावीच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत. यामध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असला तरी अन्य क्षेत्रांमध्येही खूप संधी आहेत. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी विचार करायला हवा, असे मत केसरकर यांनी व्यक्त केले. व्यावसायिक कौशल्य शिक्षण क्रमांक विद्यार्थ्यांनी कमी गुणवत्तेचे म्हणून पाहू नये. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगभरात नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतात. राज्य सरकारही अशा अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देत असून विद्यार्थ्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. एकाच विशिष्ट क्षेत्राकडे धावण्यापेक्षा अन्य उपयुक्त पर्यायांचा विद्यार्थ्यांनी जरूर विचार करावा. त्या दृष्टीने राज्य सरकारही नवनवीन उपक्रम आणि अभ्यासक्रम राबवत आहे, असेही मंत्री केसरकर म्हणाले.
ग्लोबल एक्सलन्स सेंटर: मुंबईमध्ये सध्या वरळी येथे 'ग्लोबल एक्सलन्स सेंटर'ची उभारणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना जगभरातील विविध भाषांचे ज्ञान देण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसोबतच विविध भाषांचे ज्ञान विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्यास त्यांना जगभरामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. राज्य सरकारच्या वतीने आपण नुकतेच जर्मनी येथे एक दौरा केला. या दरम्यान अनेक युरोपियन भाषा शिकल्यानंतर कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध होतात, हे जवळून पाहिले आहे. जर्मनी आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असून या माध्यमातून जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने विचार करून अभ्यासक्रम निवडावे आणि अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. त्यासाठी त्यांना लागणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची निर्मिती आणि मदत राज्य सरकारच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.